`प्रोजेक्ट चिता`ला आणखी एक मोठा धक्का, कुनो नॅशनल पार्कात शौर्य चित्याचा मृत्यू
Madhya Pradesh News: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये नर चित्ता शौर्यच्या मृत्यूने एकच खलबळ उडाली आहे. एकूण दहाव्या चित्याचा मृत्यू झालाय.
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात (MP News) असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 'शौर्य' नावाच्या चित्याच्या (Shaurya Cheetah) मृत्यूने खळबळ उडाली आहे. शौर्यला नामिबियातून कुनो नॅशनल पार्कात आणण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून आणलेल्या दहाव्या चित्याचा मृत्यू झाला आहे. शौर्यच्या मृत्यूमुळे 'प्रोजेक्ट चित्ता'ला आणखी मोठा धक्का बसला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दहा चित्यांमध्ये सात चिते आणि तीन बछड्यांचा समावेश आहे.
मंगळवारी दुपारी सवा तीन वाजता शौर्यचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टमच्यानंतर शौर्यच्या मृत्यूचं कारण समोर येईल. दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून एकूण 20 चिते कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. यातल्या 10 चित्यांचा मृत्यू झाला आहे.
20 चिते आणले भारतात
17 सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 आणि दक्षिण आफ्रिकेतन 12 चिते कूनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. प्रोजेक्ट चिता अंदर्गत एकूण 20 चिते आणण्यात आले. यातल्या नामिबियातून आणलेल्या ज्वाला नावाच्या मादी चित्याने 24 मार्चला कुनो नॅशनल पार्कमध्ये 4 बछड्यांना जन्म दिला. यातल्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला.
तीन बछड्यांचा मृत्यू
याआधी ज्वाला नावाच्या मादी चित्याने 4 बछड्यांना जन्म दिला होता. पण 23 मे 2023 रोजी यातल्या एका बछड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्वाला (Jwala) आणि तीन बछड्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. पण 25 मे 2023 ला आणखी दोन बछड्यांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशच्या मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात उन्हाची तीव्रता प्रचंड होती. त्यातच बछड्यांची प्रकृती नाजूक होती. ही सर्व परिस्थिती पाहता वन्यजीव डॉक्टरांच्या पथकाने तिन्ही बछड्यांवर तात्काळ उपचार करण्याचा निर्णय घेतला गेला. पण उपचारादरम्यान दोन बछड्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
10 चित्यांचा मृत्यू
2023 मध्ये 9 मे रोजी दक्षा नावाची मादी चिता जखमी अवस्थेत आढळली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याआधी 23 एप्रिलला उदय नावाच्या चित्याचा मृत्यू झाला. त्याची तब्येत अचानक बिघडली आणि यातच त्याचा मृत्यू झाला होता. तर 26 मार्चला साशा नावाच्या मादी चित्याच्या किडनीत संसर्ग झाला आणि दोन महिन्यांच्या उपचारानंतरही तिला वाचवण्यात अपयश आलं. आता यात शौर्य चित्याचा मृत्यूचा समावेश झाला आहे.