...अन् त्याने आग लागलेल्या बाईकवर बसून त्याच आगीतून सिगारेट पेटवली; समोर आलं विचित्र कारण
Man Seat On Bike That Caught Fire: ही रस्त्याच्या मधोमध जळत असलेली बाईक पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली असता त्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि तो थेट या जळत असलेल्या बाईकच्या बॅकसीटवर बसला. हे पाहून उपस्थितांना धक्काच बसला.
Man Seat On Bike That Caught Fire: मध्य प्रदेशमधील धार शहरांमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. शनिवारी या शहरांमधील महानगरपालिकेसमोरील रस्त्यावर अचानक एका दुचाकीला आग लागली. बाईक वेगात धावत असतानाच तिने पेट घेतला. बाईकवरील लोकांनी कशीबाशी बाईक थांबवत स्वत:चा जीव वाचवला. महानगरपालिकेसमोरील रस्त्यावरच ही बाईक जळून लागली. मात्र हा ड्रामा इतक्यावरच संपला नाही. अनेकजण लांबूनच ही बाईक जळत असताना पाहत होते. तितक्यात एकजण पुढील बाजूस जळत असलेल्या या बाईकच्या मागील सीटवर जाऊन बसला. या बाईकला लागलेल्या आगीतच त्याने सिगारेट पेटवली. या बाईकच्या आजूबाजूला तो स्टंटबाजी करु लगाला.
गर्दीतून पुढे आला अन्...
समोर आलेल्या माहितीनुसार ईश्वरगंगी हे धार महानगरपालिकेसमोरुन जात असताना अचानक त्यांच्या बाईकला आग लागली. त्यांनी बऱ्याच प्रयत्नांनी आपली बाईक थांबवली. जीव वाचवण्यासाठी ते बाईकपासून दूर जाऊन उभे राहिले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन याबद्दल कळवलं. रस्त्याच्या मधोमध जळणारी बाईक पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. काहीजण बाईकवर पाणी टाकून ती विजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हा गोंधळ सुरु असतानाच गर्दीतून अचानक एक तरुण चालत चालत आगीच्या ज्वालांमध्ये धगधगणाऱ्या बाईकजवळ पोहोचला. या जळणाऱ्या बाईकच्या मागच्या सीटवर बसून तो इशारे करु लागला. त्याने नंतर या बाईकला लागलेल्या आगीतच सिगारेट पेटवली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
आरडाओरड करुन केलं दूर
स्टंटबाजी करणारा हा तरुण या बाईकपासून दूर होण्यास तयार नव्हता. बघ्यांनी आरडाओरड करुन या तरुणाला बाजूला केलं. त्यानंतर या तरुणाने रील बनवण्याच्या नादात ही स्टंटबाजी केल्याची माहिती मसोर आली. रीलच्या नादात या तरुणाचा जीव धोक्यात आला असता. या बाईकचा स्फोट झाला असता तर तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हा संपूर्ण स्टंटबाजीचा ड्रामा संपला होता. पोलीस आणि अग्निशामन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रमुख दीपक चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकस्वाराला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.
रीलच्या नादात अनेक अपघात
मागील काही काळापासून रीलच्या नादात तरुण आपला जीव धोक्यात टाकत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मध्यंतरी वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये धबधबे आणि पाणवठ्यांजवळ रील आणि सेल्फीच्या नादात तरुण वाहून गेल्याचे, मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत. धोकादायक ठिकाणी मोबाईलचा वापर करु नये किंवा मोबाईल वापरासंदर्भात अधिक सजग रहावे असं सांगितलं जातं. मात्र या सुचनांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि आपल्याबरोबरच इतरांचा जीवही धोक्यात टाकतात.