मध्य प्रदेशात (madhya pradesh) एका पुजाऱ्याला (pandit) मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.  इंदौरमधील एका पुजार्‍याला पूजेसाठी बोलवलेल्या लोकांनी मारहाण केली. सत्यनारायण पूजेच्या (Satyanarayan Puja) वेळी केलेल्या विधींमुळे कुटुंबावर चुकीचे परिणाम झाल्याचे म्हणत पुजाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. कुंजबिहारी शर्मा असे पुजाऱ्याचे नाव असून तो मूळचा राजस्थानमधील (rajasthan) कोटा जिल्ह्यातील आहे. चंदननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अभय नेमा यांनी पीटीआयला सांगितले की, गुरुवारी पूजा केल्यानंतर  दोन मुलांनी पुजाऱ्याला बेदम मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“स्कीम क्रमांक-71 मध्ये राहणाऱ्या लोकांनी पुजाऱ्याला रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात आणले होते. लक्ष्मीकांत शर्मा यांच्या घरी 60 वर्षीय पुजार्‍याला पूजा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांची मुले विपुल आणि अरुण यांनी पुजाऱ्याला मारहाण केली. विपुलने पुजाऱ्याचा कानही कापला. पूजा झाल्यानंतर अरुण विचित्र पद्धतीने वागत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.


यानंतर पुजाऱ्याला शेजाऱ्यांनी वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांच्या मुलांना अटक केली आहे. अरुणचे लग्न होत नसल्याने ही पूजा करण्यात आली असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. 


पीडित कुंजबिहारी शर्मा यांनी पोलिसांना सांगितले की," 29 सप्टेंबर रोजी ते लक्ष्मीकांत यांच्या घरी गेले होते. दुपारी भगवान सत्यनारायणाची कथा सांगितली. रात्री मी त्याच्या घरी थांबलो. संपूर्ण कुटुंबाने माझी खूप सेवा केली आणि जेवण दिले. 30 सप्टेंबर रोजी मी तिथे झोपलो होतो तेव्हा लक्ष्मीकांत आणि त्यांचा लहान मुलगा विपुल माझ्याकडे आले. त्यांनी मला उठवले आणि म्हणाले की तू आमच्या घरी कोणती पूजा केली आहेस? अरुण विचित्र वागत आहे."


त्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी विरोध केल्याने त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचा मोठा मुलगा अरुणही तेथे पोहोचला. त्यानेही मला मारहाण केली. दरम्यान, लहान मुलाने धारदार शस्त्राने माझा उजवा कान कापला. मी आरडाओरडा करत होतो, आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी मला वाचवले. कानाचा कापलेला भाग शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. स्थानिक रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आले, असे पुजारी कुंजबिहारी शर्मा यांनी सांगितले.


या प्रकरणी तपास अधिकारी विशाल परिहार यांनी सांगितले की, पुजाऱ्याने पोलीस ठाण्यात धारदार शस्त्राने त्यांचा कान कापल्याची तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे.