लडाख : कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
लडाख : लडाखमधील कारगिलमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, पहाटे 3 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात 3 जुलै रोजी संध्याकाळी भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता पृष्ठभागापासून 35 किमी अंतरावर दिल्ली-एनसीआरसह इतर भागातही भूकंपाचे हादरे जाणवले. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
हरियाणामधील गुरुग्राम जिल्ह्यातही शुक्रवारी भूकंपाचे हादरे जाणवले. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती.
एकीकडे कोरोना संकट असताना दुसरीकडे देशात नैसर्गिक आपत्तीही चिंतेची बाब ठरत आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान केलं. तर यूपी, बिहारमध्ये वीज कोसळून आतापर्यंत अनेकांना मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळल्याने शनिवारी जवळपास 43 जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने, वादळामुळे मोठी जीवितहानी झाली होती. वीज पडून तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान वादळानेही मोठं नुकसान केलं.