मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महाचक्रीवादळानं रौद्ररुप धारण केल आहे. पुढील २४ तासांत हे वादळ गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला मध्यरात्री ते ७ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत ते पोरबंदर दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात तसंच उत्तर कोकणातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे जिल्ह्यांसह नंदुरबार, धुळे, नाशिक या पाच जिल्ह्यांत वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याकडून अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलेला आहे. त्यात भर म्हणून आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महाचक्रीवादाळाचा प्रभाव आणखी चार दिवस कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. हे चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक सज्ज झाले आहे.

दीवचा समुद्रकिनारा आणि गुजरातच्या पोरबंदर बंदराच्या दरम्यान हे वादळ जमिनीला धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत हे वादळ आणखी तीव्र होईल आणि त्यानंतर त्याचा जोर थोडा कमी होत जाईल. 6 नोव्हेंबरला मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला पहाटे हे वादळ गुजरात किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. 120 किमी प्रतितास पर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला असेल. पुढचे तीन दिवस समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.