मंत्रीपदासाठी दिल्लीत लॉबिंग? आमदार अब्दुल सत्तार थेट दिल्लीत दाखल
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? अब्दुल सत्तार यांनी सांगितली तारीख
दिल्ली : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारास दिल्लीतून हिरवा कंदिल अद्याप मिळालेला नाही. यामुळे विस्तार जुलै अखेर ही होणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गेल्या 30 जूनला झाला. पण तब्बल एक महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
पण मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असला तरी शिंदे गटात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झालंय. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे दिल्लीत दाखल झाले आहेत. सत्तार दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा रंगू लागलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणाला किती जिल्हे मिळणार आहेत, किती खाती मिळणार आहेत, कोणाला किती मंत्रीपद मिळणार आहे याच्या वाटाघाटी कदाचीत झालेल्या असतील, पण अंतिम निर्णय झालेला नाही, या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
तसंच तीन ऑगस्टच्या आत शपथविधी होईल अशी महत्त्वाची माहितीही अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. आम्ही कोणतीही अट ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेलो नाही, मंत्रिपद देणं किंवा न देणं हा त्यांचा निर्णय असून तो जे निर्णय घेतील तो योग्य असेल असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करणार आहे, मला राजीनामा देण्याची परवानगी द्या, आमच्या पन्नास आमदारांपैकी पहिला राजीनामा मी देणार आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. 31 तारखेला आपल्या मतदारसंघात महामेळावा आहे, यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे, यावेळी आपण राजीनामा देऊ असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.