नवी दिल्ली : महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते स्वतंत्र बैठका घेत आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते उपस्थित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते या बैठकीनंतर सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी १० जनपथला जातील. सोनिया गांधींशी चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या ६ जनपथ येथे बैठक होणार आहे.


एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ ६ जनपथला पोहोचले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सोनिया गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार नाहीत.


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला, मंत्रीमंडळातील खातेवाटप, महामंडळाचे वाटप,किमान समान कार्यक्रम, विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांचं वाटप कसं असावं याबाबत तयारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबत शिसेनेशी चर्चा केली जाईल. शिवसेनेबरोबर अंतिम चर्चा करण्याआधी दोन्ही पक्षात एकवाक्यता नर्माण करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केल्याचं समजतंय.


राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुरु असतानाच दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. आज सकाळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.