नवी दिल्ली : राज्यातला सत्तासंघर्ष हा दिल्लीमध्ये पोहोचला आहे. सकाळी अमित शाह यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली. नितीन गडकरींना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याच्या चर्चा सुरु होत्या, पण हा भाजपचा अंतगर्त विषय आहे. आम्ही अशी कोणतीही मागणी केली नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे दिल्लीमध्येच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. या दोघांच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याबाबत राज्यातल्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले राज्यातले काही नेते हे शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांचा मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहेत. तसंच याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार आणि सोनिया गांधीच घेतील, असं या नेत्यांनी सांगितलं आहे.


इकडे मुंबईमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. लवकरात लवकर सरकार स्थापन करावं, शिवसेना अडथळा ठरणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावतीने राज्यपालांची आपण सदिच्छा भेट घेतली. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.


विधानसभा निवडणुकीच्या १२ दिवसानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे रोज सामनामधून आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला करत आहेत.


आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपानं सगळी मंत्रिपदं घ्या, पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेचंच आहे, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी 'झी २४ तास'शी बोलताना मांडली आहे