किरीट सोमय्या यांची प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्याबाबतची भूमिका काय?
Kirit Somaiya On Pratap Sarnaik And Yashwant Jadahav : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपच्या किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांना जेरीस आणलं.
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपच्या किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांना जेरीस आणलं. सोमय्यांच्या तक्रारींमुळेच शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी हे ईडीच्या रडारवर आले. यशवंत जाधव आणि प्रताप सरनाईक हे त्यापैकीच. मात्र आता राज्यात अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर सत्तापालट झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट-भाजप सत्तेत आले. (maharashtra political crisis what roll now of kirit somaiya about pratap sarnaik and yashwant jadhav after new government in state)
त्यामुळे आता शिंदे गटासोबत असलेल्य नेत्यांबाबत सोमय्यांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. याबाबतच झी 24 तासने सोमय्यांना विचारलं.
सरनाईक आणि जाधव यांच्याबाबत सोमय्या काय म्हणाले?
"यशवंत जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यावर आधीच कारवाई झाली आहे. दोघांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच हा विषय न्यायालयातही आहे. एकाची बेनामी इमारत जप्त करण्यात आली आहे. तर दुसऱ्याची 25 कोटींची जमीन जप्त झाली आहे. आता हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. पुढचा निर्णय न्यायालय घेईल", असं सोमय्या यांनी सांगितलं.
भाजपला डागाळळेल्या लोकांची मदत घेण्याची काय गरज पडली?
"लोकं आनंदाने नाचातायेत. 164 मध्ये 2 जण आहेच. गेले अनेक दिवस उद्धव ठाकरे आणि संजय राऊत प्रयत्न करतायेत. चॅनेलचाही घसा बसला. पण 2 च्या पलीकडे काहीच नाही", असं सोमय्या यांनी स्पष्ट केलं.
"164 मधून दोघांचीच नावं सापडली. त्या दोघांवरही कारवाई झालेली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि न्यायालयाने यापैकी कोणीही कोणतीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे विषय संपला", असं म्हणत सोमय्या यांनी या मुद्द्याला पूर्णविराम दिला.
पार्टी विथ डिफरन्स म्हणवणारी भाजप डागाळलेल्या लोकांसोबत सत्ता कशी स्थापन करु शकते?
"समोर 40 मधील सर्वच्या सर्व डागाळलेले होते. 40 जण बदमाश होते. ते माफिया होते. त्यावेळेला 165 लोकं म्हणून ठाकरे आणि राऊत या प्रकारेच माफियागिरी करत होते. हे दोघे चोर होते, तरी तुम्ही यांना सांभाळत होतात, असं त्यावेळेला संजय राऊत यांना विचारावं वाटलं नाही का", असं म्हणत सोमय्या यांनी मुद्दा गुंडाळण्याचा प्रयत्न केला.
माफिया सरकार संपली
"नव्या सरकारमुळे राज्यातील साडे 12 कोटी जनतेला आनंद झालाय. तसेच मलापण एक मोहिम पूर्ण झाल्याचं समाधान आहे. उद्धव ठाकरे यांची माफिया सरकार संपली. ठाकरे सरकारने दहशत माजवली होती. मनसुख हिरनेची हत्या, नेव्ही ऑफिसरला घरात घुसून मारहाण करणं, केतकी चितळेच्या भूमिकेशी मी सहमत नाही. मात्र एका तरुणीला 40 दिवस जेलमध्ये ठेवलं. राणा दाम्पत्यांना जेलमध्ये टाकलं, तो कायदाच नव्हता. अशा प्रकारच्या माफिया सरकारचा अंत झाला, याचा मला प्रचंड आनंद झाला", अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली. तसेच सरकार पडल्याचा आनंद झाल्याचं सांगितलं.