Maharashtra Politics : राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या काही समर्थक आमदारांसह सूरतमध्य आहेत. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं 56 वर्षांमधलं सर्वात मोठं बंड असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई सोडून गुजरातमधल्या सूरतमध्ये मुक्काम ठोकला असून आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 


दरम्यान, काही आमदारांना बळजबरीने सूरतला नेल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. कारण कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनाही सूरतला घेऊन जाण्यात येत होतं, पण मोठ्या शिताफीने कैलास पाटील हे गुजरात बॉर्डरवरून निसटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


काल रात्री विधानपरिषद निवडणूकीचा निकाल लागल्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आमदारांच्या जेवणावळी झडल्या. त्यानंतर अनेक आमदारांना वेगवेगळ्या वाहनांनी सूरतला नेल्याची माहिती समोर येत आहे. यात आमदार कैलास पाटील यांचाही समावेश होता. 


साडे दहाच्या सुमारास एकूण सहा गाड्यांनी सर्व आमदारांना घेऊन जाण्यात येत होतं, पण ठाणे ओलांडल्यानंतरही वाहनं थांबत नसल्याने कैलास पाटील यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर पुढे ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली. यावेळी कैलास पाटील लंघुशंकेचं कारण देत गाडीतून उतरले आणि मोठ्या शिताफीने तिथून निसटले. 


रात्रीचा अंधारात कैलास पाटील यांनी चिखलातून वाट काढत काही वेळ प्रवास केला त्यानंतर त्यांनी एका दुचाकीस्वाराला विनंती करत पुढचा 2 किलोमीटरचा प्रवास केला. पुढे एका ट्रकला हात दाखवत त्यांनी मुंबईपर्यंत नेण्याची विनंती केली. ट्रकवाल्याने त्यांना दहिसरपर्यंत आणलं,  तिथे त्यांनी आपला फोन सुरु केला आणि आपल्या वाहनाने थेट वर्षा बंगला गाठला.


त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना दमदाटी किंवा दबाव टाकून नेलंय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.