CBSE नंतर राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होणार, शिक्षण विभागातील सूत्रांची माहिती
CBSE बोर्डाची बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्यानंतर आता राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होणार आहे.
दीपक भातुसे, मुंबई : सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे बारावी बोर्डची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात येणार नाहीत. सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेला बसणार्या सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण होऊ शकतील. (CBSE Board Class XII examinations cancelled)
सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता राज्यातील परीक्षाची रद्द होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. दहावी प्रमाणे बारावीची परीक्षा न घेण्याची राज्य सरकारची आधीपासूनच मानसिकता आहे. याबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेकडे राज्य सरकारचे लक्ष होते.
ऑगस्टमध्ये परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते, त्यासाठी बारावीचा निकाल महत्त्वाचा असतो. बारावीच्या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी बसले आहेत. ही संख्या पाहता कोरोनाचे आकडे कमी होईपर्यंत बारावीची परीक्षा घेता येणार नाही.
विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा
सीबीएसईने म्हटलं की, 'मागील वर्षीप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर परिस्थिती अनुकूल झाल्यास सीबीएसई त्यांना असा पर्याय देईल.'
पंतप्रधान मोदींच्या बैठकीत निर्णय
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सीबीएसईचे अध्यक्ष, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.