Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी...यांच्या लग्नात उडाला गोंधळ...असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा संबंध सध्या चाललेल्या राजकारणाशी जोडत असला तर थोडं थांबा. कारण निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांकडून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी स्पर्धा लावून दिली जाते. पण या लग्नात घडलेली घटना तुमच्याबाबत कधीही घडू शकते. त्यामुळे लग्न करत असाल किंवा घरी कोणाच्या लग्नात सहभागी होणार असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशच्या उज्जेनमधील इंदौर रोडजवळ एक डेस्टिनेशन वेडींग सुरु होते. यामध्ये वर हा महाराष्ट्रीयन मुलगा तर वधू ही गुजरातची होती. या दोघांनी थेट मध्य प्रदेशमध्ये डेस्टिनेशन वेडींग करायचा निर्णय घेतला. जवळच्या नातेवाईकांना निमंत्रण दिलं. इतर एखाद्या डेस्टिनेशन वेडींगप्रमाणे आपलं लग्न देखील धामधुमीत होईल, असे त्यांना वाटत होते. पण झालं भलतंच. 


लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात तरबेज चोर घुसले. त्यांनी एक एक कोपरा पकडला. आणि संधी मिळाली तसे दागिने आणि कॅशवर डल्ला मारला. यानंतर कॅशने भरलेली बॅग घेऊन पळू लागले. ही लाखो रुपयांची चोरी सीसीटीव्ही कॅमरामध्ये कैद झाली. यात 2 चोर दिसत आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर जवळच्या नीलगंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत. 


उज्जेनमध्ये महाकाल मंदिर असल्याने लाखो भक्तांची येथे रेलचेल असते. यामुळे हे एक डेस्टिनेशन वेडिंगसाठी आवडते स्थळ बनले आहे. फाटक रोडमधील इंम्पियरियल हॉटेलमध्ये हे लग्न सुरु होते. लग्नानंतर सुरु झालेल्या रिसेप्शनमध्ये दोन्ही परिवार व्यस्त होते. 


चोरांचा तपास सुरु 
रिसेप्शनमध्ये चोर हे पाहुणे बनून आले. चांगले कपडे घातले, सर्वांना स्माईल देत आले, त्यामुळे कोणाला त्यांच्यावर जास्त संशय आला नाही. मुलाकडच्यांना वाटलं मुलीकडचे असतील. तर मुलीकडचे म्हणत होते की मुलाच्या घरचेच पाहुणे असतील. पण हे कोणाचेच नव्हते ते केवळ आपला डाव साधायला आले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते स्टेजजवळ गेले. जवळच असलेले सोने, दागिने आणि साधारण 4 लाखांची कॅश असलेली बॅग घेऊन पसार झाले. 


पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी चोर आपल्या साथीदाराला सोबत घेऊन आल्याचे त्यांनी पाहिले. त्याचा मित्र हॉलच्या बाहेर रेकी करत होता. आत गेलेल्या चोर मित्राची वाट पाहत होता. मुख्य चोर बाहेर आल्यानंतर त्याच्या मित्राने बाईक सुरु केली आणि दोघेही पसार झाले. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 


ज्यांच्या घरात लग्नाची धावपळ सुरु असेल त्यांनी आपल्या दागिने, पैशांची काळजी घ्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.