मुंबई : महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे. त्यानुसार बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याचा तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय. बुलेट ट्रेन हा केंद्रातील मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र त्या प्रकल्पासाठीचा निधी आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वळवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च करून जपानच्या कंपनीच्या सहकार्यानं मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबवण्यात येणार होता. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आगामी सरकारनं जर राज्याच्या वाट्याचा निधी देण्यास नकार दिला तर केंद्राला मोठा झटका बसणार आणि हा निधी कुठून तरी उभारावा लागेल.


राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. त्यासाठी आज दिल्लीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका होत आहेत. या बैठकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईला येणार आहेत. मुंबईला आल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते शिवसेना नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला आणि किमान समान कार्यक्रमाबद्दल माहिती दिली जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.