पोलीस स्टेशनमधले महिला कर्मचाऱ्याचे ठुमके व्हायरल, निलंबनाची कारवाई
सोशल मीडियाचा वापर जसा चांगल्यासाठी केला जातो तसाच त्याचा वापर आपल्याविरुद्धही होऊ शकतो
मेहसाणा : टीक-टॉक व्हिडिओचं फॅड किती पसरलंय, हे लक्षात येण्यासाठी ही बातमी पुरेशी आहे. रस्ते, घर, ऑफिस, बस, ट्रेन अशा प्रत्येक ठिकाणी अनेक जण टीक-टॉक व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावरून इतरांशी शेअर करतात. परंतु, हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. असंच एक प्रकरण नुकतंच गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातून समोर येतंय. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं चक्क पोलीस स्टेशनमध्ये ठुमके लगावत एक टीक-टॉक व्हिडिओ बनवला... हा व्हिडिओ थोड्याच वेळात व्हायरलही झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर तत्काळ या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
या महिला कर्मचाऱ्याचं नाव अर्पिता चौधरी आहे. अर्पितानं तुरुंगाच्या समोर उभं राहूनच हा टीक-टॉक व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ २० जुलै रोजीचा आहे. हा व्हिडिओ मेहसाणा जिल्ह्यातील लागनज पोलीस स्टेशनचा आहे.
सोशल मीडियाचा वापर जसा चांगल्यासाठी केला जातो तसाच त्याचा वापर आपल्याविरुद्धही होऊ शकतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्पिता चौधरी हिच्याविरुद्ध कारवाईची मागणी होऊ लागली.
डेप्युटी सुपरिटेन्डन्ट मनजिता वंजारा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. अर्पिता चौधरी हिनं नियमांचं उल्लंघन केल्याचं सिद्ध झाल्यानंतर तिला निलंबित करण्यात आलंय.
पोलीस अधिकाऱ्यांनी नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे, अर्पितानं या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात
आल्याचं मनजिता वंजारा यांनी स्पष्ट केलंय.