महाबळेश्वरमध्ये वाघोबाचं दर्शन; आनंद महिंद्रांनी व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी सुधारली चूक
`... आणि आम्हाला वाघ दिसला` असा उल्लेख आला की....
मुंबई : अमुक एका व्याघ्रप्रकल्पाला भेट दिली किंवा तमुक एका अभयारण्याला भेट दिली, असं सांगत असताना त्या व्यक्तीच्या अनुभवांमध्ये '... आणि आम्हाला वाघ दिसला' असा उल्लेख आला की ऐकणाऱ्याचं कुतूहल आणि उत्सुकता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरुनच व्यक्त होताना दिसते.
एखादा अशाच प्रसंगाचा व्हिडीओ पाहतानाही पाहणाऱ्याची साधारण अशीच प्रतिक्रिया. नुकतंच महिंद्रा अँड महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी महिंद्राच्या एका कारचा उल्लेख करत हा व्याघ्रदर्शनाचा व्हिडीओ अद्वितीय असल्याची प्रतिक्रिया दिली.
महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहताना त्यावर काही माहिती दिसते. त्यानुसार हा व्हिडीओ महाबळेश्वर मार्गे जाताना लागणाऱ्या पाचगणी क्षेत्रातील असल्याचं कळत आहे. वाघ दिसल्याची भीती, उत्सुकता आणि कुतूहल अशा अनेक भावना तो समोरुन पाहणाऱ्या व्यक्तींच्या आवाजातून व्हिडीओ पाहताना जाणवते.
आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून, काही तासांतच तो प्रचंड लोकप्रिय झाला. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ठिकाण महाबळेश्वर दाखवण्यात आलं आहे. पण, मुळात ते महाबळेश्वर नसल्याचं म्हणत सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यातील असल्याचं सांगितलं.
कोणी हा व्हिडीओ महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील असल्याचं सांगितलं. तर कोणी हा व्हिडीओ 2 वर्षे जुना असल्याचं सांगितलं.