एकल मातांच्या मुलांना पॅनकार्ड अर्जावर वडिलांचे नाव बंधनकारक नको - मनेका गांधी
सध्याच्या पद्धतीनुसार संबंधित व्यक्तीला पॅनकार्ड अर्जात आपल्या वडिलांचे नाव नमूद करणे बंधनकारक आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी एकल मातांच्या मुलांसाठी पॅनकार्ड अर्जात बदल करावेत, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अर्थमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले आहे. या पत्रात मनेका गांधी यांनी म्हटले आहे की, एकल मातांच्या मुलांच्यादृष्टीने पॅनकार्ड अर्जातील काही अटी शिथील करण्यात याव्यात. काही महिला या पतीपासून घटस्फोट घेऊन वेगळ्या राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांना कुठल्याही कागदपत्रांवर आपल्या मुलाच्या नावापुढे पतीचे नाव लागावे, अशी इच्छा साहजिकच नसते. त्यामुळे अशा एकल मातांच्या मुलांना पॅनकार्डच्या अर्जात वडिलांचे नाव लिहण्याची सक्ती करु नये, असे मनेका गांधींचे म्हणणे आहे.
सध्याच्या पद्धतीनुसार संबंधित व्यक्तीला पॅनकार्ड अर्जात आपल्या वडिलांचे नाव नमूद करणे बंधनकारक आहे. अनेक ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणूनही पॅनकार्ड सर्रासपणे ग्राह्य धरले जाते. त्यामुळे पॅनकार्ड अत्यंत गरजेचे असते. परंतु, एकल मातांच्या मुलांना काहीशा अनिच्छेने अर्जात वडिलांचे नाव नमूद करावेच लागते. त्यामुळे हा नियम बदलावा, असे मनेका गांधींनी सांगितले. जेणेकरुन भविष्यात एकल मातांना मुले दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. तसे झाल्यास या मुलांना वडीलच नसतील. त्यामुळे त्यांनाही पॅनकार्ड मिळण्यात अडथळे येऊ शकतात. यापूर्वी केंद्र सरकारने पासपोर्टच्या नियमांमध्येही बदल केले होते. पूर्वीच्या पद्धतीनुसार घटस्फोटित एकल मातांच्या मुलांना पासपोर्टच्या अर्जावर वडिलांची सही आणणे गरजेचे होते. मात्र, २०१६ साली पासपोर्ट नियमात सुधारणा करुन ही अट रद्द केली होती.