होशंगाबाद : सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर इतका वाढला आहे की त्या आभासी जगात लाइक्स मिळवण्यासाठी लोक जीवाचीही पर्वा करत नाहीत. युवा वर्गात तर लाईक्स मिळवण्यासाठी चढाओढ सुरु असते, आणि यासाठी त्यांची काहीही करायची तयारी असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. होशंगाबादमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. हा तरुण रेल्वे ट्रॅकजवळ उभा राहून व्हिडिओ बनवत होता. तरुणाच्या मृत्यूचा हा थरार कॅमेरात कैद झाला आहे.



नेमकी घटना काय?


होशंगाबाद जिल्ह्यातील पांजरा गावात रहाणारा संजू चौरे हा तरुण रविवारी त्याच्या दोन मित्रांसह पिकनिकला गेला होता. तिघे मित्र इटारसी इथल्या शरद देव यांच्या जंगलात सहलीसाठी गेले होते. यावेळी संजूने रेल्वे रुळलगत उभं राहून मागून येणाऱ्या ट्रेनसोबत व्हिडिओ बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वेगाने येणाऱ्या ट्रेनला हुलकाणी देण्याचा व्हिडिओ बनवायचं ठरलं. त्याचे मित्र मोबाईलमधून व्हिडिओ चित्रित करु लागले.


ठरल्याप्रमाणे संजू रेल्वे लगत उभा राहिला, मागून भरधाव वेगाने ट्रेन आली. पण संजूचा अंदाज चुकला आणि भरधाव वेगाने आलेल्या ट्रेनने संजूला धडक दिली. संजूच्या डोक्याला जोरदार फटका बसला. संजूच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेलं पण त्याधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 


या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.