Maldives vs India : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता, मोदींनी त्याचे फोटो सोशल मीडियावर ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. मालदीवने भारतासमोर वर डोळे केल्याने भारताने आवश्यक अशी पाऊलं उचलली होती. मालदीवच्या राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (mohamed muizzu) यांनी चीनशी जवळीक साधत भारतावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता. अशातच आता राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी सूर बदलल्याचं पहायला मिळतंय. मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारात इंडिया आउटचा नारा दिला होता. अर्थातच त्याला चीनचा मजबूत पाठिंबा होता. सत्तेत आल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांना माघार घेण्याचे आदेश दिले. भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्व्हे करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध दुरावल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात मुइझू यांनी राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनंदन केले आणि दोन्ही देशांमधील संबंध आणि आदर यावर भर दिलाय.


मालदीव आणि भारताची मैत्री शतकानुशतके जुनी आहे. मालदीवच्या जनतेच्या आणि सरकारच्या वतीने भारताच्या जनतेचे आणि सरकारचे अभिनंदन...  भारतासाठी शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा आहेत, असं मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आता चीनच्या आठमुठी भूमिका मालदीवच्या पचनी पडणार नसल्याचं दिसून येतंय. मालदीवला आठवलेली मैत्री ही ढोंग आहे की काय? असा सवाल विचारला जातोय.



दरम्यान, दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मालदीवचे अध्यक्ष मुइझू हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी भारताला वारंवार टार्गेट केलं होतं. त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला. आपण एक छोटा देश असू शकतो पण त्यामुळे आपल्याला धमकावण्याचा परवाना कोणालाही मिळत नाही, असं मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं होतं. मात्र, आता मोहम्मद मुइज्जू यांनी भारताची शतकानुशतके जुनी मैत्री का आठवतीये? असा प्रश्न विचारला जातोय.