नवी दिल्ली: स्वामी विवेकानंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शिकागोतील आमचा कार्यक्रम RSS आणि भाजपने दबाव आणून रद्द करायला लावला, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. शिकागो येथील विवेकानंद वेदांत सोसायटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ११ सप्टेंबरला ममता बॅनर्जी याठिकाणी उपस्थित राहणार होत्या. मात्र, भाजप व संघाने ऐनवेळी आयोजकांवर दबाव आणून हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले, असे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. 


भाजप आणि संघाकडून स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्लोबल हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. शिकागोत याशिवाय अन्य कोणताही कार्यक्रम होऊ नये, हा संघ व भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांना निमंत्रण असलेल्या विवेकानंद वेदांत सोसायटीच्या आयोजकांवर त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यासाठी मोठा दबाव आणण्यात आल्याचेही तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात आले.