कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना महिन्याला १ हजार रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतगर्त ८ हजार पंडितांना लाभ मिळणार आहे. जशाप्रकारे वक्फ बोर्ड सगळ्या इमामांना वजीफा देतं, अशाचप्रकारे पुजाऱ्यांनाही १ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय ज्या पुजाऱ्यांकडे घर नाही, अशांना बंगाल आवास योजनेमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. राज्यातल्या पुरोहितांनी सरकारकडे जमिनीची मागणी केली होती. राजरहाटमध्ये ते संस्थेची स्थापना करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी ही घोषणा केली आहे. याशिवाय ममता बॅनर्जींनी कोरोना व्हायरस, हिंदी दिवस यावरही भाष्य केलं. कोरोनाबाबत ग्लोबल एडव्हायजरी बोर्डाने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. राज्यातल्या वाढलेल्या टेस्ट आणि बेड संख्येमुळे आपण समाधानी आहोत. पहिल्यापेक्षा जास्त निशुल्क ऍम्ब्युलन्स देत आहोत, असं ममता म्हणाल्या. तसंच दुर्गा पूजेसाठीचे मंडप खुले असावेत, ज्यामुळे हवा खेळती राहिल, असा सल्लाही त्यांनी दिला. 


आज हिंदी दिवस आहे. आमची मातृभाषा बांगला आहे, पण इतर सर्व भाषांना आम्ही बरोबरीने सन्मान देतो. आम्ही बंगालीशिवाय हिंदी, उर्दू, कामतापुरी, राजबंशी, ओल चिकी या भाषांनाही मान्यता दिली आहे. आम्ही २०११ साली हिंदी अकादमीची घोषणा केली होती, आता त्यावर काम सुरू आहे आणि यासाठी एक समिती स्थापन केली असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जींनी दिली.