पाण्याचा फुगा मारण्यावरुन वाद, तरुणावर चाकू हल्ला
धुळवड संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दिल्लीत मात्र, रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली : धुळवड संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दिल्लीत मात्र, रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे.
दिल्लीतील धक्कादायक घटना
एका किरकोळ वादानंतर एका युवकावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील खानपूर परिसरात असलेल्या दुग्गल कॉलनीत हा प्रकार घडला आहे.
बचाव करणाऱ्या तरुणावर हल्ला
हल्लेखोर आणि पीडित व्यक्ती हे एकाच परिसरात राहतात. हल्लेखोरांपैकी दोघांनी एका मुलावर पाण्याचा फुगा मारला होता. त्यानंतर या दोन तरुणांनी त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहिल्यानंतर आशिष नावाच्या तरुणाने त्या चिमुकल्याचा बचाव केला.
हल्लेखोरांनी पळ काढला आणि नंतर...
हल्लेखोरांनी त्यावेळी तेथून पळ काढला आणि नंतर पाहून घेतो अशी धमकी आशिषला दिली. त्यानंतर हल्लेखोर आपल्या २० मित्रांसह घटनास्थळी पोहोचले आणि आशिषवर हल्ला केला.
चाकू आणि रॉडने मारहाण
गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आशिष जिममधून बाहेर पडला. आपली स्कुटी घेवून आशिष घरी जात असताना हल्लेखोरांनी त्याला रोखले. हल्लेखोरांनी चाकू आणि रॉडने जबर मारहाण केली. या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला आहे.
तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी
आशिषला मारहाण करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेच्यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी आरोप केलाय की, घटनेची पोलिसांना सूचना दिल्यानंतर १ तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथे उपस्थित नागरिकांनीच पीडित आशिषला मॅक्स रुग्णालयात दाखल केलं.