वायफाय बंद केल्यामुळे पतीने पत्नीला केली जबरदस्त मारहाण...
स्मार्टफोन आणि इंटरनेटचे आपल्या मनातील जाळे अधिक घट्ट होत जात आहे,
नवी दिल्ली : स्मार्टफोन आणि इंटरनेटचे आपल्या मनातील जाळे अधिक घट्ट होत जात आहे, असे दिसत आहे. याचे एक उदाहरण ८ मार्चला अगदी महिला दिनाला पाहायला मिळाले. इंटरनेटचा आपल्या मनावर इतका पगडा आहे की त्यापुढे आपल्याला आपली नाती देखील दुय्यम वाटू लागतात. याबद्दल तरुणाईला अनेकदा बोलले जाते. पण या चक्रव्यूहात आपण सगळेच अडकत चाललो आहोत.
अशीच एक धक्कादायक घटना
याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. वायफाय बंद केल्यामुळे पतीने आपल्या पत्नीला अगदी वाईट पद्धतीने मारहाण केली. त्यामुळे प्रकृती गंभीर झालेल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पतीला सोशल मीडियाचे व्यसन
हैद्राबादच्या सोमाजीगुडा येथे राहणाऱ्या ओमर पाशा आणि रेश्मा यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. ओमरला रात्रभर इंटरनेट सर्फींग करण्याची सवय आहे. तो कायम सोशल मीडियावर अॅक्टीव असतो. गुरूवारी मध्यरात्री पर्यंत त्याचा इंटरनेट वापर सुरू होता. त्यामुळे त्रासलेल्या रेश्माने वायफाय बंद केला.
वायफाय बंद केल्यामुळे ओमर भडकला आणि त्याने पत्नीला मारायला सुरूवात केली. जबरदस्त मारहाण करत असताना रेश्माच्या ओरडण्याने शेजारचे जमले आणि त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.