पायमोजाच्या वासामुळे सहप्रवासी हैराण, प्रवाशाला अटक
शूजचा वास येत असेल तर, तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
मुंबई : प्रवासाला निघत असाल, त्यातही प्रवास दूरचा असेल तर, आपले शूज आणि पायमोजे जरूर तपासा. योग्य पद्धतीने ते स्वच्छ केले आहेत किंवा नाहीत. त्याचा वास तर, येत नाही ना? हे पुन्हा पुन्हा तपासून पहा. अन्यथा तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
होय, तुम्ही जे वाचले ते खरे आहे. घटना आहे हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील. 26/27 नोव्हेंबच्या रात्री प्रकाश कुमार नावाचा एक प्रवासी धर्मशालाहून दिल्लीला येत होता. वॉल्वो बसमधून प्रवास करणाऱ्या या प्रवाशाने पायात शूज घातले होते. अस्वस्थ करणारा प्रकार असा की, प्रकाश कुमार याच्या शूज आणि पायमोजांचा प्रचंड उग्र आणि तितकाच घाणेरडा वास येत होता. त्यावासामुळे सहप्रवाशांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी प्रकाश कुमार याला हे पायमोजे बॅगेत बंद करावेत किंवा बाहेर टाकून त्यावेत असे सांगितले. पण, प्रकाशने त्याला नकार दिला.
सहप्रवाशांनी अनेकदा विनंती करून, रागने सांगूनही फरक पडला नाही. प्रकाश कुमार आपल्या निर्णयावर ठाम राहिला. तो शूज काढूनही फेकत नव्हता किंवा बॅंगमध्येही ठेवत नव्हता. अखेर, सहप्रवाशांना तो वास अगदीच असहय्य झाला. त्यामुळे वाद वाढला. शेवटी वैतागलेल्या प्रवाशांनी बस उना जिल्ह्यातील हायवेलगत असलेल्या पोलीस स्टेशनवर थांबवली आणि तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकाश कुमारला अटक केली.
प्रकाश कुमारला सोमवारी (27 नोव्हेंबर) डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. येथे त्याला जामीन मिळाला. पण, प्रकाश कुमारचे म्हणने असे की, माझ्या शूजचा मुळीच वास येत नव्हता. पण, सोबतच्या प्रवाशांनी माझ्यासोबत विनाकारण भांडण केले.