एका दुचाकीवर बसले 7 लोक, ट्राफिक पोलिसांनी पकडताच सांगितलं विचित्र कारण
दुचाकीवर सात लोक बसून त्याने ट्राफिकचा एकच नियम तोडला नव्हता, तर त्याने हेलमेट देखील घेतलं नव्हतं.
मुंबई : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एका ऑटो रिक्षात 27 जण स्वार झाल्याची बातमी हल्लीच समोर आली होती, त्यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका दुचाकीवर सात लोक एकत्र बसले असल्याची घटना घडली आहे. ही घटना औरैया जिल्ह्यातील आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक बाईकस्वार त्याच्यासोबत 6 मुलांना घेऊन कुठेतरी चालला होता, त्यावेळेस त्याला ट्राफीक पोलिसांनी पकडलं आहे.
दुचाकीवर सात लोक बसून त्याने ट्राफिकचा एकच नियम तोडला नव्हता, तर त्याने हेलमेट देखील घेतलं नव्हतं.
पोलिसांनी दुचाकीवरून 6 मुलांसह बाजारात फिरणाऱ्या व्यक्तीला अडवून एक हजार रुपयांचे चलन कापले. पोलिसांनी त्या व्यक्तीचे चालान कापले आणि अशी चूक पुन्हा करू नये अशा कडक सूचनाही दिल्या. त्यावेळी बाजारातील कोणा एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पोलिसांनी त्या तरुणाला थांबवून विचारणा केली असता तो विचित्र कारणे सांगू लागला. तरुणाने पोलिसांना सांगितले की, बकरीदनिमित्त तो कानपूर ग्रामीण भागातून औरैया या नातेवाईकाच्या घरी आला होता. यानंतर त्याच्या घरातील आणि आजूबाजूच्या मुलांनी आईस्क्रीम खाऊ घालण्याचा आग्रह धरल्याने तो मुलांना घेऊन आला. त्यानंतर दुचाकीशिवाय दुसरे वाहन नसल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यक्तीचे कारण काहीही असले तरी असं एका दुचाकीवरुन इतक्या लोकांनी प्रवास करणे हे फारच चुकीचे आहे. चुकीचे म्हटण्यापेक्षा यामुळे लोकांना जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही स्वत: अशी चुक करु नका, शिवाय दुसऱ्याला देखील असे करु देऊ नका.