भोपाळ : मुघल सम्राट शहाजहाँ यानं त्याची पत्नी मुमताज हिच्यासाठी एक अद्वितीय वास्तू उभारून घेतली. या वास्तूकडे आज सारं जग जगातील आश्चर्यांपैकी एक, या दृष्टीनं पाहतं. ताजमहाल बांधून अनेक वर्षे उलटली, पण ही वास्तू आजही प्रेमाची ग्वाही देत प्रत्येक पिढीसाठी अनेक आठवणींचा साठा जोपासण्याचं काम करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताजमहाल बांधल्यानंतर तशी वास्तू पुन्हा उभारताच येऊ नये, यासाठी शहाजहाँननं कारागिरांचे हात कापले होते. ही क्रूरता म्हणा किंवा आणखी काही. 


शहाजहाँची ही वास्तू अनेक कारणांनी इतिहासापासून सद्यस्थितीपर्यंत चर्चेत राहिली आणि यापुढेही राहील यात शंका नाही. 


आता मुद्दा असा, की ही वास्तू पुन्हा उभारली जाऊ नये असाच शहाजहाँचा आग्रह म्हणा किंवा हट्ट. पण, प्रेमात असणारी लोकं कधीहीकाहीही करु शकतात, अशक्य गोष्टीही शक्य करु शकतात.


याचीच प्रचिती दिली आहे, मध्य प्रदेशातील आनंद चोक्सी यांनी. बरहाणपूर येथील चोक्सी यांनी पत्नीसाठी ही वास्तू म्हणजेच चक्क ताजमहालच्या आकाराचा बंगला बांधला आहे. 


बंगल्यामध्ये एक मोठा हॉल, स्वयंपाकघर, चार बेडरुम, ग्रंथालय आणि ध्यानधारणेसाठी एक खोली आहे. ही वास्तू उभी करण्यासाठी 3 वर्षांचा काळ लागला. 


पत्नी मंजुषा यांना आनंद यांच्याकडून ही अविस्मरणीय अशी भेट देण्यात आली आहे. तसं, बरहाणपूर आणि ताज यांचं एक अतुट नातं आहे. 


काय आहे ते नातं? 
मुमताजचा मृत्यू बरहाणपूरमध्येच झाला होता. ज्यामुळं शहाजहाँला तापी नदीच्या किनारीच एक वास्तू उभारायची होती. 


काही कारणास्तव ते शक्य झालं नाही आणि ताजमहाल आग्र्यात बांधला गेला. 


शहाजहाँचं तेच अपूर्ण स्वप्न चोक्सी यांनी 21 व्या शतकात पूर्ण केलं. ज्यामुळं त्यांना 21 व्या शतकातील शहाजहाँ म्हणणं वावगं ठरणार नाही... 



ही वास्तू बांधणाऱ्या कारागिरांचे हात कलम झाले नाहीत, उलटपक्षी वास्तूची झलक पाहून त्यासाठी चक्क गौरव करण्यात आला. 


आहे की नाही, ही गोष्ट वाह ताज! म्हणण्याजोगी?