नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरमधील एका तरुणाच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईचं अचानक निधन झाल्याने त्या तरुणाला मोठा धक्का लागला. हा धक्का इतका गंभीर होता की, त्याने आपल्या आईचं प्रेत तब्बल तीन दिवस घरातच ठेवलं आणि त्याशेजारी बसून राहीला.


या तरुणाचं म्हणणं होतं की, त्याच्या आईच्या शरीरात आत्मा घालण्यासाठी त्याने आईचं प्रेत तीन दिवस घरात ठेवलं.


बर्फाच्या लादीवर ठेवलं प्रेत 


जनरलगंज परिसरात राहणारा विकास आपल्या आईकडे आला होता. त्याच दरम्यान ७५ वर्षीय शांती या डोक्याला दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या निधनाची बातमी ऐकताच विकासला धक्का बसला. त्याने आपल्या आईच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याऐवजी चक्क घरातच बर्फाची लादी आणली आणि त्यावर प्रेत ठेवलं.


प्रेतामध्ये आत्मा टाकण्याचा होता प्रयत्न


आपल्या आईच्या प्रेतात विकासला आत्मा टाकायचा होता त्यामुळेच त्याने आईचं प्रेत मुंबईला नेण्याचं ठरवलं. तो कानपूर रेल्वे स्थानकात गेला मात्र, अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्राशिवाय प्रेत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यानंतर विकासने आईचं प्रेत घरातच बर्फाच्या लादीवर ठेवलं.


जवळपास चार दिवस विकासने आईचं प्रेत घरात ठेवलं. मात्र, त्यानंतर घरातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होताच शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. ज्यावेळी पोलीस विकासच्या घरी दाखल झाले त्यावेळी संपूर्ण प्रकार उघडकीस आला.