पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागायला गेली, महिलेवर ओढावला भयंकर प्रसंग; सावकारानेच...
Crime News In Marathi: पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
Crime News In Marathi: माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना राजस्थानच्या नागौरमध्ये घडली आहे. मदतीसाठी आलेल्या महिलेच्या असहायत्तेचा फायदा घेत एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला आहे. तसंच व्हिडिओही व्हायरल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
पतीच्या असहायत्तेचा घेतला फायदा
पीडित महिलेच्या पतीचा अर्धांगवायूचा झटका आला होता. त्याच्या उपचारांसाठी महिलेने एका व्यक्तीकडून पैसे उधार घेतले होते. मात्र, उधार देणाऱ्या व्यक्तीने व्याजाच्या बदल्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. इतकंच नव्हे तर त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
पतीला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्याच्या पत्नीने उपचारांसाठी पैसे जमवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र कुठेच पैशांची सोय होत नव्हती. त्यानंतर कुोणीतरी तिला दिल्ली दरवाजा परिसरात राहणाऱ्या मेहरदीनसोबत संपर्क करण्यास सांगितला. मेहरदीन या व्याजी पैसे देतो असं तिला सांगण्यात आले होते. महिलेने मेहरदीनकडे जाऊन दहा हजार रुपये उधार घेतले. पैसे उधार घेतल्यानंतर तिने काही दिवसांनी त्यातील 5 हजार रुपये पुन्हा त्याला परत केले.
उरलेले पैसे ती महिन्याला 500 रुपये असे देत होती. मात्र, एक दिवस महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता त्याचवेळी मेहरदीन महिलेच्या घरी गेला होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर त्याने या घटनेचा व्हिडिओदेखील बनवला आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर आत्महत्येचा प्रयत्न
मेहरदीन महिलेला घेऊन जोधपूरच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्यात आला, असं आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला पाण्यातून बाहेर काढून वाचवले आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.