लखनऊ - गेल्या महिन्यात घडलेल्या बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांना तपासात मोठे यश मिळाले आहे. हिंसाचारात मृत पावलेले पोलिस अधिकारी सुबोधकुमार सिंग यांच्यावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली. या अटकेमुळे घटनेच्या तपासाला वेग येणार असून, या प्रकरणातील सर्व आरोपांना गजाआड करणे शक्य होणार आहे. गेल्या महिन्यात ३ डिसेंबरला उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये पोलिस अधिकारी सुबोधकुमार सिंग आणि स्थानिक तरुण सुमित यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलुआ असे मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बुलंदशहरमध्येच एका निर्जनस्थळी तो दडून बसला होता. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी सकाळी त्याला अटक केली. त्याच्याकडून कुऱ्हाडही जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांनी ही माहिती दिली. कलुआने सुबोधकुमार सिंग यांच्या डोक्यावर कु्ऱ्हाडीने वार केले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. कलुआला मंगळवारीच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सिंग यांच्यावर गोळी झाडणारा प्रशांत नट यालाही पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. 


बुलंदशहरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुलकुमार श्रीवास्तव म्हणाले, या प्रकरणातील आरोपींकडे केलेल्या चौकशीत कलुआनेच सुबोधकुमार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती मिळाली होती. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. कलुआला अटक करण्यात आल्यामुळे आता या प्रकरणातील उर्वरित आरोपींना गजाआड करण्यास मदत होणार आहे. 


घटना घडली त्यावेळी जमावाने सुबोधकुमार सिंग यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. त्यानंतर प्रशांतने त्यांच्यावर गोळी झाडली, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे.