शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पंतप्रधानांनी घेतली दखल
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनाची दखल आज थेट पंतप्रधानांनी घेतली.
इंदौर : मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनाची दखल आज थेट पंतप्रधानांनी घेतली.
अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथ सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यासह पंतप्रधानांनी विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत मध्यप्रदेशात उद्धभवलेल्या परिस्थितीचा आढवा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, आज मंदसौर इथं पोलिसांच्या गोळीबारात पाच आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर या कर्जमाफी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. शेतकऱ्यांनी मंदसौरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की केलीय. शेतकऱ्यांचा संताप पाहून अधिका-यांनीही पळ काढला.
शेतक-यांनी यावेळी जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांनाही मारहाण केली असून त्यांचे कपडे फाडून टाकले. तत्पूर्वी बरखेडापंत गावातल्या शेतक-यांनी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह रस्त्यावर आणत चक्काजाम केला होता.
तणाव वाढत चालल्याचं पाहून प्रशासनाने परिसरात कर्फ्यू जाहीर केलाय. जिल्ह्यातील काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलीय. दरम्यान यावेळी घटनास्थळी जाणा-या माजी खासदार मिनाक्षी नटराजन यांनाही पोलिसांनी रोखलंय.