एकाच झाडाला चक्कं 121 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे आंबे, पाहा हे कसं शक्य झालं?
आंबा प्रेमींना आता वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी वेगवेगळ्या भागातील आंबे मागवण्याची गरज नाही.
सहारनपूर : सहारनपूर : भारताच्या वेगवेगळ्या भागात पिकणाऱ्या आंब्याला त्या त्या भागातल्या भौगेलीक परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारची चव असते. काही आंबा प्रेमी अशा वेगवेगळ्या चवींचा स्वाद घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातील आंबे मागवतात. परंतु उत्तर प्रदेशातील एका भागात आंब्याच्या झाडाला 121 प्रकारचे आंबे येतात. ज्यामुळे आंबा प्रेमींना आता वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी वेगवेगळ्या भागातील आंबे मागवण्याची गरज नाही. आंब्याचे अनेक प्रकार असतात. आपण आंब्याचे कोणत्याही प्रकारचं फळं आनंदाने खातो. त्यात हापूस, कलमी, रत्नागिरी, बदामी असे वेगवेगळे आंब्याचे प्रकार आहेत.
उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील 15 वर्षांच्या आंब्याच्या झाडाला 121 प्रकारची फळे येतात. ज्यामुळे हे झाड सध्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. खरेतर या झाडावर बागकामगारांनी पाच वर्षांपूर्वी एक प्रयोग केला होता. त्यांचं हे फळ असल्याचे येथील लोकं सांगतात. हा प्रयोग करण्यामागे या लोकांचं उद्दीष्ट होतं की, आंब्याच्या नवीन जाती विकसित करणे आणि त्यांच्या चवीत बदल करणे.
एकाच झाडावर अनेक प्रकारचे आंबे
सहारनपूरच्या फलोत्पादन आणि अभ्यास केंद्राचे सहसंचालक भानू प्रकाश राम म्हणाले, "या नवीन प्रयोगाचा आंब्यांच्या प्रकारांचा आढावा घेणे हा हेतू होता. सहारनपूर हे शहर आधीपासूनच आंबा उत्पादनासाठी नंबर एकवर आहे. या भागात नेहमीच आंबा बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते. या कारणास्तव, येथे नवीन प्रकारच्या आंब्याबाबत संशोधन केले गेले आहे."
एकाच झाडावर 121 प्रकारचे आंबे
फलोत्पादन प्रयोग आणि प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन सहसंचालक राजेश प्रसाद यांनी आंब्याच्या झाडावर 121 प्रकारचे आंब्याची लागवड केली. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, "देशी आंब्याच्या झाडाच्या फांदीवर विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या लावण्यात आल्या. या झाडाच्या देखभालीसाठी स्वतंत्र नर्सरी प्रभारी नेमण्यात आले. आता या झाडावर दशहरी, लंगडा, चौंसा, रामकेला, आम्रपाली, सहारनपुर अरुण, सहारनपूर वरुण, सहारनपूर सौरभ, सहारनपूर गौरव आणि सहारनपूर राजीव यासह आंब्याचे विविध प्रकार आढळतात."
नवीन प्रजातींवर काम चालू आहे
या व्यतिरिक्त लखनौ सफेदा, टॉमी एट किंग्स, पूसा सूर्या, सेन्सेशन, रतौल, कलमी मालदा आंबा, बॉम्बे, स्मिथ, मांगीफेरा जालोनिया, गोला बुलंदशहर, लरंकू, एलआर स्पेशल, आलमपूर बेनिशासह आंब्याच्या इतर जातीदेखील या झाडावर वाढवण्यात येणार आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, नवीन प्रजातींवर काम चालू आहे, जेणेकरुन आंब्याच्या चांगल्या जाती तयार करता येतील.