नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांवरून कायमच चर्चेत राहणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आता राममंदिरावरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'राजा दशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या त्यामुळे श्रीराम कुठल्या खोलीत जन्माला आले कुणाला माहीत? त्यामुळे तुम्ही कोणत्या आधारावर मंदिर बनवण्याच्या गोष्टी करता' असं वक्तव्य त्यांनी केलंय. दिल्लीत 'सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया'द्वारा आयोजित 'एक शाम बाबरी मस्जिद के नाम' या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना समाज माध्यमांवर अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. ६ डिसेंबरचा दिवस भारत देशासाठी पतनाचा दिवस होता. ६ डिसेंबर १९९२ मध्ये जे काही झाले ते व्हायला नको होते, असंही त्यांनी म्हटलंय. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्याकडून मोठी चूक झाल्याचंही ते आपल्या वकव्यात म्हणालेत. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याची घटना म्हणजे संविधानाची हत्या असल्याचंही मणिशंकर अय्यर यांनी म्हटलंय.


महात्मा गांधींची हत्या आणि बाबरी मस्जिद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिशंकर अय्यर यांनी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याच्या घटनेवर काँग्रेसवरही ताशेरे ओढलेत. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. त्यांनी ठरवलं असतं तर ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झालीच नसती, असं म्हणत त्यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिलाय. महात्मा गांधी यांची हत्या आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणं या दोन्ही घटना एकसारख्याच घटना असल्याचं सांगत 'मुस्लीम या देशात सुरक्षित राहू शकतात का?' असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. 


देशात अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि अनेक हिंदूत्ववादी संघटनांकडून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राम मंदिराच्या मुद्यावर १० जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या दरम्यान मणिशंकर अय्यर यांचं हे वक्तव्य मोठा वाद निर्माण करू शकतं.