Manipur landslide: मणिपूर भूस्खलनात 14 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या धास्तावणारी
ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात आलं.
Manipur landslide: देशवासियांच्या काळजात चर्रsss करणारी घटना मणिपूरमध्ये घडली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार इथं झालेल्या भयंकर भूस्खलनानमध्ये सध्याच्या आडकेवारीनुसार 14 जणांचा मृत्यू ओढावला आहे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात आलं. यापैकी 14 जणांची प्राणज्योत मालवली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली.
प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली 60 हून अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये गावकरी, स्थानिक आणि सैन्य- रेल्वे सेवेतील व्यक्तींचा समावेश आहे. काही मजुरही ढिगाख्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय सैन्यातील आसाम रायफल्सच्या तुकडीकडून घटनास्थळी बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात असणाऱ्या तुपूल रेल्वे स्थानक परिसरात ही दुर्घटना घडली.
अतीवृष्टीमुळं झालेल्या भूस्खलनाच्या या दुर्घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही आढावा घेण्यात आला. ट्विट करत त्यांनी आपण मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संवाद साधल्याची माहिती दिली. शिवाय आपण मुख्यमंत्र्यांना शक्य ती सर्व मदत करण्याची तयारी दाखवत आश्वस्त केल्याचंही पंतप्रधानंनी या ट्विटमध्ये लिहिलं.