Manipur Violence : मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा (Manipur women paraded naked) व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या सर्वच स्तरातून या धक्कादायक घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे 62 दिवसांपूर्वी घडलेली ही घटना तीन दिवसांपूर्वी उजेडात आल्याने आणखी संताप व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत मणिपूर पोलिसांनी ( Manipur Police) आत्तापर्यंत मुख्य आरोपी हुइराम हेरोदाससह चार जणांना अटक केली आहे. अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या महिलेला विवस्त्र करुन धिंड काढण्यात आली त्या महिलेचा पती कारगिल युद्धात (Kargil War) सहभागी होता तसेच ते निवृत्त सुभेदार  असल्याचे समोर आले आहे. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत धोकादायक आणि भीतीदायक आहे असे या माजी सैनिकाने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कारगील युद्धासाठी लढलेल्या जवानाने आपली आपबिती सांगितली आहे. "या घटनेने मला इतके दुखावले की मी त्याचे वर्णन करू शकत नाही. मी श्रीलंकेत, कारगीरमध्येही देशाचे रक्षण केले पण आता निवृत्तीनंतर मी माझ्या पत्नीचे रक्षण करू शकलो नाही. जमावाने विवस्त्र करून ज्या प्रकारे मारहाण केली, त्याची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. कोणत्याही वन्य प्राण्याच्या हल्ल्यापेक्षा ही घटना अधिक धक्कादायक होती," असे या निवृत्त सैनिकाने म्हटलं आहे.


मणिपूरच्या घटनेत दोन महिलांची नग्न धिंड करण्यात आली होती. तर एफआयआरमध्ये तिसऱ्या महिलेला जबरदस्तीने कपडे काढायला लावल्याचा उल्लेख आहे. मात्र ती व्हिडिओमध्ये दिसत नाही. भारतीय लष्करातील सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्या महिलेच्या पतीने कारगिलमध्ये लढा दिला आहे. चुराचंदपूर येथील एका मदत शिबिरात असेलल्या या माजी सैनिकाने सांगितले की मी आपली प्रतिष्ठा, घर आणि सर्व कमाई या घटनेत गमावलं आहे.


नेमकं काय घडलं?


"3 आणि 4 मे रोजी हजारो लोकांच्या जमावाने नऊ गावांवर हल्ला केला होता. त्यांनी तिथली घरं जाळली आणि पाळीव प्राण्यांची हत्या केली. 4 मे रोजी हे लोक आमच्या गावात शिरल. तिथेही त्यांनी घरं पेटवून देण्यास सुरुवात केली. सगळे जण स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागले. त्याच गडबडीत माझी पत्नी माझ्यापासून वेगळी झाली. माझी पत्नी जंगलाच्या दिशेने पळाली. तिथे गावातल्या काही लोकांसह ती लपून बसली होती. तिथे हा सगळा जमाव गेला त्यांनी माझ्या पत्नीसह इतर लोकांना पकडलं. त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या," असे माजी सैनिकानं सांगितले आहे.



मणिपूरमधेय राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे - आदित्य ठाकरे


"या देशाचे नागरिक म्हणून कोणावरही अत्याचार झाले तर संताप आलाच पाहिजे. मणिपूरच्या सरकारमुळे देशात आणि जगात आपलं  नाव खराब होत आहे. मणिपूर सरकार बरखास्त झालं पाहिजे. त्या सरकारची हकालपट्टी झाली पाहिजे. तिथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे," अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी विधानसभे बाहेर केली आहे.