`जेम्स बॉण्ड कहां है...`; संजय राऊतांच्या निशाण्यावर अचानक अजित डोभाल का?
Sanjay Raut On NSA Ajit Doval: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
Sanjay Raut On NSA Ajit Doval: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी देशात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी केवळ पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा न साधता देशाचे मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावरही टीका केली आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी या तिघांना लक्ष्य केलं आहे.
युक्रेन रशियाला जातात पण मणिपूरला नाही
"मणिपूर हा या भारताचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या अडीच वर्षापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्वतःला 'विश्वगुरू', 'नॉन बायोलॉजिकल ईश्वराचे अवतार' मानतात. ते रशिया आणि युक्रेन मधील युद्ध मिटवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध भूमीवर जातात. मोदी युद्धभूमीवर आहेत म्हणून चार तास रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही असे ढोल अंध भक्त वाजवतात. मोदी पूतीनबरोबर चहा पितात घरात बसून मग झेलेन्सकीला भेटतात युद्धबंदी वर चर्चा करतात. असे ते फार मोठे आहेत. एक निधड्या छातीचे नेते आपल्या देशाला लाभलेले आहेत. या महान नेत्याला आमच्या देशातल्या मणिपूरमधील अत्याचार थांबवता येत नाहीत. ते अपयश त्याने स्वीकारले पाहिजे. प्रधानमंत्री अद्याप मणिपूरला गेले नाहीत. एअर इंडिया वन घेऊन ते जगभरात फिरत आहेत," असं राऊथ म्हणाले.
अक्षर बोलायला तयार नाही याचा अर्थ काय?
गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत आहेत राजकीय बैठका घेत आहेत. निवडणुकांची तयारी करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत पण मणिपूरवर कधी बोलणार? आता पंडित नेहरू नाही आहेत दोष द्यायला. मणिपूरची अवस्था ज्या काळात कश्मीर पेटलं असतं त्याच्यापेक्षा भयंकर आहे. मोदी आणि अमित शहा एक अक्षर बोलायला तयार नाही याचा अर्थ या देशातल्या जनतेने काय घ्यायचा? मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं. ॲक्शन दाखवण्यापेक्षा तिकडे जा जरा नाहीतर राजीनामा द्या," अशी टीका राऊत यांनी केली.
डोभाल यांनाही लगावला टोला
राऊत यांनी अजित डोभाल यांच्यावर टीका करताना, "मणिपूरची अंतर्गत सुरक्षा पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. तिथे रॉकेटने हल्ले होत आहेत. बॉम्बने हल्ले होत आहेत. तिथे युद्धस्थिती आहे. आपले ते कोण आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार... जेम्स बॉण्ड... कुठे आहेत ते? ते आता युक्रेनचं युद्ध आणि इस्रायलचं युद्ध थांबवण्यासाठी जाणार आहेत," असा टोला लागवला आहे. "मोदींचे फोटो आले की ते युद्धभूमीवर चालत आहेत. त्यांनी मणिपूरच्या रस्त्यांवर चालून दाखवावं," असं आव्हान राऊत यांनी दिलं.