नराधमांना फाशी द्या! मणिपूरची घटना लज्जास्पद, देशातल्या महिला नेत्यांचा संताप
मणिपूरची धग सगळ्या देशभर पसरलीय.... मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार एवढं भयावह होते की अख्खा देश यामुळे अक्षरसः पेटून उठलाय... गल्ली ते दिल्ली मणिपूर घटनेबद्दल संताप व्यक्त केला जातोय. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देशभरातून होतेय.
Manipur Viral Video : मणिपूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. नराधमांना फाशी द्या अशी मागणी देशभरातून केली जात आहे. भारतभरात संतापाची लाट उसळलीय. लज्जास्पद घटनेमुळे हिंसाचारानं पेटलेल्या मणिपुरात संतापाचा भडका उडाला आहे.
मणिपूरमधली लज्जास्पद घटना
मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड (manipur women video) काढण्यात आली. मणिपूरच्या खांगपोकी जिल्ह्यातल्या बी फैनोम गावात हा धक्कादायक प्रकार घडला. घटना 4 मे रोजी घडली असली तरी त्याचा व्हिडिओ 79 दिवसांनी समोर आला. मणिपूरमध्ये मैतेयी आणि कुकी समाजात (Kuki) आरक्षणावरून मोठा संघर्ष पेटलाय. त्यामधूनच कुकी समाजाच्या 2 महिलांची मैतेयी समाजाच्या लोकांनी विवस्त्र करुन धिंड काढली 2 महिलांना विवस्त्र करुन दोरीला बांधून शेतात नेण्यात आलं आणि तिथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलीय, तर एका आरोपीचं घर जमावानं जाळलंय...
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसा (manipur violence) सुरू आहे. मात्र महिलांसोबत झालेल्या या घृणास्पद प्रकाराची क्लिप बाहेर आल्यामुळे सुप्रीम कोर्टानंही याची गंभीर दखल घेतली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कारवाई करण्याचे निर्देश केंद्राला दिले. तर पंतप्रधान मोदींनीही या घटनेवर कमालीचा संताप व्यक्त केलाय. मणिपूरचा मुद्दा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि विधानसभा ते लोकसभेपर्यंत धगधगतोय. विरोधकांनी या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी केली आणि सरकारला धारेवर धरत संसदेचं कामकाज बंद पाडलं.
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर पेटलंय. आतापर्यंतच्या हिंसाचारात दीडशेच्या वर लोकांचा मृत्यू झालाय. तर सुमारे 60 हजार लोक बेघर झालेत. त्याच मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन धिंड काढली. संपूर्ण देशाला लज्जेनं मान खाली घालायला लावणारी अत्यंत संतापजनक अशी ही घटना. अशी हिंमत करणा-या विकृतांचा नंगानाच वेळीच थांबायला हवा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी..
महिला नेत्यांचा संताप
मणिपूर घटनेवरुन देशातल्या महिला नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार सभ्य समाजाचे दाखले देतात, पण अशा घटना देशासाठी दुर्भाग्यपूर्ण आहेत. व्हिडिओत दिसणारी लोकं त्या घटनेला जितकी जबाबार आहेत, तितकंच मोदी सरकारही या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाच्या खासादर जया बच्चन यांनीही या प्रकरणी टीका केली आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्ण बघू शकले नाही, कारण तो व्हिडिओ पाहून लाज आणि संताप आणणारा आहे. मेमध्ये घडलेल्या या घटनेवर एका नेत्यानेही भाष्य केलं नाही, हा महिलांचा अपमान आहे, असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.