Manipur Women Viral Video Culprit Arrested: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्या प्रकरणी आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर कारवाई केली आहे. महिलांची धिंड काढणाऱ्या गर्दीमधील मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पेची अवांग लीकाई येथे राहणाऱ्या 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव हुइरेम हेरोदास मेइतेई असं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं या आरोपीचे 2 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये  पीडित महिलेच्या छातीवर दोन्ही हात ठेऊन तिला शेतात घेऊन जात असलेल्या व्हिडीओमधील स्क्रीनशॉटचा आहे. तर दुसरा फोटो या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतरचा आहे.


देशभरात संतापाची लाट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिपूर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या अटकेसंदर्भात 'हिंदुस्तान टाइम्स'ला माहिती दिली. या प्रकरणामधील एफआयआरमध्ये बलात्कार आणि हत्येच्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अन्य आरोपींनाही अटक करण्यात येणार आहे. 4 मे रोजी शूट करण्यात आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये कुकी समुदायाच्या 2 महिलांची नग्नावस्थेत धिंड करण्यात आली. या महिलांचे शारीरिक शोषण करण्यात आलं. हा सर्व हिंसाचार घडला तेव्हा 800 ते 1 हजार लोकांची गर्दी घटनास्थळी होती. बी फीनोमा गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट दिसून येत आहे. संसदेपासून बॉलिवूडपर्यंत अनेकांनी या विषयावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. 


महिलांनीच लावली घराला आग


आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या गावातील महिला एकत्र आल्या आणि हा जमाव आरोपीच्या घराच्या दिशेने चालत गेला. या जमावामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या महिलांनी आरोपीचं घर पेटवून दिलं. आरोपी कोणत्याही समाजाचा असला तरी आम्ही महिलांच्या प्रतिष्ठेविरुद्ध करण्यात आलेली ही वागणूक सहन करु शकत नाही, असं या महिलांनी म्हटलं आहे.


नेमकं घडलं काय?


दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, 5 जणांचं एक कुटुंब हल्ला करणाऱ्या जमावापासून स्वत:ला वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावू लागलं. संपूर्ण गावावर जवळपास 1 हजार लोकांनी हल्ला केला. लूटमार आणि घरांना आग लावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या कुटुंबाला वाचवलं. पोलीस या पीडितांना सुरक्षित स्थानावर घेऊन जात असतानाच जमावाने पोलिसांच्या तावडीतून या लोकांना आपल्या ताब्यात घेतलं. ज्या लोकांना पोलिसांकडून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलं त्यामध्येच या 2 पीडित महिला होत्या. 



या महिलांसमोरच एकाची हत्या


हल्ला करणाऱ्या या जमावातील एका गटाने नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशनपासून 2 किलोमीटर दूर टूबुल येथे या कुटुंबाला आपल्या ताब्यात घेतलं. यावेळी एका 56 वर्षीय व्यक्तीची जमावाने हत्या केली. त्यानंतर त्यांनी या 3 महिलांवर हल्ला केला. या महिलांचे कपडे काढण्यात आले आणि त्यांची नग्नावस्थेत धिंड काढली. या जमावाने यावेळी एका 21 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कारही केल्याचा आरोप केला जात आहे.