नवी दिल्ली : पंजाब विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या वैयक्तिक पुस्तक संग्रहालयातली ३,५०० पुस्तकं विद्यापीठाला दान म्हणून दिली आहेत. पुस्तकांबरोबरच मनमोहन सिंग यांनी काही फोटो आणि स्मृती चिन्हही विद्यापीठ प्रशासनाला दिली आहेत. नवी दिल्लीवरून ही पुस्तकं, फोटो आणि स्मृती चिन्ह लवकरच विद्यापीठात आणली जातील, अशी माहिती पंजाब विद्यापीठानं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमोहन सिंग यांनी दिलेली पुस्तकं आणि इतर वस्तू विद्यापीठातल्या गुरु तेग बहादुर भवनामध्ये ठेवण्यात येणार आहेत. विद्यापीठातल्या लायब्ररीमध्ये या पुस्तकांसाठी वेगळा कक्ष बनवण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना ही पुस्तकं सहज उपलब्ध होतील आणि शोधताही येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


मनमोहन याच विद्यापीठात शिकले


जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असलेले मनमोहन सिंग यांनी १९५०च्या दशकात पंजाब विद्यापीठातच शिक्षण घेतलं. पंजाब विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनमोहन याच विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर होते. ३२व्या वर्षी मनमोहन सिंग या विद्यापीठात प्रोफेसर झाले. १९६०च्या दशकापर्यंत त्यांनी इकडे विद्यार्थ्यांना शिकवलं. २००४ साली काँग्रेसचा विजय झाल्यावर सोनिया गांधींनी त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली. मनमोहन सिंग २००४ ते २०१४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.