नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे देशातील आर्थिक व्यवहार अनेक दिवस बंद राहिले आहेत. सध्या या गोष्टी पूर्वपदावर येत असल्या तरी आगामी काळात आर्थिक मंदी येणे अपरिहार्य आहे. ही आर्थिक मंदी खोलवर परिणाम करणारी आणि दीर्घकाळ असेल. त्यामुळे मोदी सरकारने मंदीमुळे कमीतकमी नुकसान होण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh)  यांनी व्यक्त केले. मनमोहन सिंग यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत आगामी आर्थिक आव्हानांविषयी भाष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी मनमोहन सिंग यांनी म्हटले की,  आर्थिक मंदी हे एक मानवी संकट आहे. सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे लोकांसमोरील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. देशातील लॉकडाऊन टाळता येणे शक्य नव्हते. मात्र,  लॉकडाऊनची घोषणा अत्यंत घाईगडबडीत झाली. तसेच यानंतर असंवेदनशील आणि अविचारीपणे कठोर निर्बंध लादण्यात आल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले. 



भविष्यात या परिस्थितीतून सावरण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला तीन उपाय सुचवले आहेत. जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर येईल. यावेळी मनमोहन सिंग यांनी लोकांच्या हातात थेट पैसे देण्याच्या धोरणाचे समर्थन केले. यामुळे देशाचा डेब्ट टू जीडीपी रेश्यो debt to gdp ratio वाढेल. मात्र, त्यामुळे लोकांचा जीव वाचत असेल, त्यांना रोजीरोटी मिळत असेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळत असेल तर केंद्र सरकारने या गोष्टी कराव्यात, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. 

मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुचवलेली त्रिसुत्री


* सर्वप्रथम लोकांची रोजीरोटी सुरक्षित राहील, याची काळजी सरकारने घ्यावी. त्यासाठी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. जेणेकरून त्यांची क्रयशक्ती वाढेल. 
* उद्योगधंद्यासाठी सरकारने पुरेसे भांडवल उपलब्ध करुन दिले पाहिजे. यासाठी क्रेडिट गॅरंटी प्रोगामचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. 
* संस्थांत्मक स्वायत्तता आणि प्रक्रियेच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्राच्या financial sector समस्या सोडवल्या पाहिजेत.