...म्हणून ट्रम्प यांच्या पंगतीला बसण्यास काँग्रेस नेत्यांचा नकार
मोदींच्या शब्दकोशात लोकशाहीचा वेगळा अर्थ असावा.
नवी दिल्ली: डॉ. मनमोहन सिंग आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ मंगळवारी रात्री राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. 'पीटीआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी सुरुवातीला या समारंभाचे निमंत्रण स्वीकारले होते. मात्र, सोमवारी त्यांनी अचानकपणे या समारंभाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले.
ट्रम्पनी भाषणात घेतलं सचिन-विराटचं नाव, म्हणाले...
तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी हेदेखील भोजन समारंभाला जाणार नाहीत. काँग्रेसश्रेष्ठींना या समारंभाचे निमंत्रण न मिळाल्यामुळे या दोघांनी या भोजन समारंभावर बहिष्कार टाकल्याचे समजते.
'त्या' वहीत ट्रम्प यांनी नेमकं काय लिहिलं?
आमच्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रण देण्यात आले नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक मोठ्या लोकशाही व्यवस्थांचे प्रतिनिधी आहेत. लोकशाहीत परंपरागत शिष्टाचार आणि सभ्यता अशा घटकांचा अंतर्भाव असतो. जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेत गेले होते तेव्हा Howdy Modiच्या व्यासपीठावर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटस अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले होते. मात्र, मोदींच्या शब्दकोशात लोकशाहीचा वेगळा अर्थ असावा. मात्र, मोदींना स्वत:च प्रकाशझोतात राहायचे आहे. काँग्रेस हा १३४ वर्ष जुना पक्ष आहे. सर्व लोकशाही देशांमध्ये आमच्या नेत्यांविषयी माहिती आहे. मात्र, तरीही त्यांना राष्ट्रपती भवनातील सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले नाही. हा काँग्रेस पक्षाचा अपमान आहे. त्यामुळे मला नाईलाजाने हे निमंत्रण नाकारावे लागत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.