ट्रम्पनी भाषणात घेतलं सचिन-विराटचं नाव, म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. 

Updated: Feb 24, 2020, 07:52 PM IST
ट्रम्पनी भाषणात घेतलं सचिन-विराटचं नाव, म्हणाले... title=

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी ट्रम्प त्यांची पत्नी मिलेनिया यांच्यासोबत गुजरातच्या अहमदाबादमध्ये असलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणासोबत ट्रम्प यांचं स्वागत केलं. ट्रम्प यांनी खचाखच भरलेल्या मोटेरा स्टेडियममधून कोट्यवधी भारतीयांना संबोधित केलं. आपल्या भाषणादरम्यान ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचं नाव घेतलं.

'जगभरात लोकं भारतीय चित्रपट, भांगडा आणि डीडीएलजे, शोले यांच्यासारख्या चित्रपटांचा आनंद घेतात. याशिवाय भारतात सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू आहेत. १ लाख २५ हजार लोकं या स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. आपल्या देशाला मजबूत ठेवा, आमचं भारतावर प्रेम आहे, ' असं ट्रम्प म्हणाले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीदेखील मोटेराच्या या कार्यक्रमाला हजर होते.

मोटेरा स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात. या स्टेडियमची ड्रेनेज क्षमताही शानदार असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस थांबल्यानंतर २० मिनिटांमध्ये मैदान खेळण्यासाठी तयार होईल.

सोमवारी सकाळी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. तिकडे प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचं स्वागत केलं. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मिलेनिया, मुलगी इवांका, जावऊ जे. कुशनेर आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन, वाणिज्य मंत्री विलबर रॉस, उर्जा मंत्री डॅन ब्रोईलेट आणि उच्च स्तरीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित आहे.