नवी दिल्ली : राफेल विमान डील प्रकरणी मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून क्लिन चीट देण्यात आली. या क्लिन चीटनंतर माजी संरक्षण मंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राहुल गांधींसाठी काही शिकण्यासारखा धडा असल्याचं उत्पल पर्रिकर यांनी ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राफेलबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे आणि मला आशा आहे की हा निर्णय राहुल गांधींसाठी एक चांगला धडा शिकवून गेला असेल. याचं श्रेय मी त्यांच्या कमकुवत राजकीय खेळीला देऊ इच्छितो. हे अगदी तसंच आहे ज्याप्रमाणे ते अशाच प्रकारची राजकीय खेळी करण्यासाठी माझ्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी आले होते.' अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी राहुल गांधीवर टिका केली आहे.


काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये पर्रिकरांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राहुल गांधी यांनी दावा केला की, पर्रिकरांनी त्यांना राफेल विमानाच्या डीलमध्ये केलेल्या बदलांबाबत त्यांना माहिती नसल्याचं सांगितलं होतं. 


  


राहुल गांधींचा हा दावा पर्रिकरांनी फेटाळून लावत, राहुल गांधींनी पाच मिनिटांच्या या भेटीचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर करु नये, असं सांगितलं होतं. माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं १७ मार्च रोजी निधन झाले.