गोवा : माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर यापुढे दिल्लीतील एआयआयएमएस (All India Institute Of Medical Science)मध्ये उपचार होणार आहेत. यासाठी, त्यांना एका खाजगी विमानानं दिल्लीला रवाना करण्यात आलंय. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा उत्पल पर्रिकर तसंच दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर हेदेखील होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रिकर यांच्यासाठी या खास विमानाची सोय केली होती. पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत राजकीय परिस्थिती मात्र 'जैसे थे' राहणार आहे. पर्रिकर यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात येणार आहेत.



अमेरिकेतल्या १४ आठवड्यांच्या उपचारानंतर जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मनोहर पर्रिकर गोव्यात परतले होते... मायभूमीत परतल्यानंतर पर्रिकर यांनी लगेचच कामालाही सुरुवात केली होती. 'उपचारानंतर तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद, पाठिंबा आणि प्रार्थनेमुळे मी पुन्हा एकदा कामावर रुजू झालोय. तुमचे आशिर्वाद असेच असू द्या... गोव्याच्या विकासासाठी मी तुमच्या सेवेत सादर झालोय, अशी मी खात्री देतोय' असा निरोप पर्रिकरांनी व्हिडिओतून आपल्या चाहत्यांना यावेळी दिला होता.