महाविद्यालयांनी ड्रेसकोड ठरवल्याने विद्यार्थ्यांची निराशा
महाविद्यालयाच्या पहिल्याच सञात विद्यार्थ्यांनी कपड्यांचा धसका घेतलाय.
दिपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष नुकतंच सुरु झालंय. मुंबईतील बहुतांश विद्यार्थ्यांना ड्रेस को़ड ठरवून दिल्याने महाविद्यालयाच्या पहिल्याच सञात विद्यार्थ्यांनी कपड्यांचा धसका घेतलाय. विद्यार्थी शिक्षणासाठी येतात म्हणून केवळ नीट नेटके कपडे घालून यावं असा नियम महाविद्यालयांमध्ये करण्यात आलाय. फाटकी जीन्स, गु़डघ्यापर्यंतची कपडे, स्ट्रिप टॉप, असे अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आल्यास त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत नसल्याचे महाविद्यालयांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी मुंबईतील सेंट झेव्हीअर्स, एसएनडीटी विद्यापीठ अशा मोजक्याच शिक्षण संस्थांनी असा निर्णय घेतला होता पण आता अनेक महाविद्यालय आपल्या या भूमिकेवर ठाम आहेत.
कोणताही विद्यार्थी शॉर्ट्स कपड्यांवर महाविद्यालयात आला तर त्याला आम्ही प्रवेश देत नाही. हा नियम आहे. विद्यार्थ्यांनी ही शिस्त पाळायला हवी. तशी माहितीच आम्ही आमच्या प्रवेश पुस्तिकेतही स्पष्ट देतो असे रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुश्री लोकूर यांनी 'झी २४ तास' ला सांगितले. तर पोद्दार महाविद्यालयाच्या उप प्राचार्य कविता जाजू सांगतात 'आम्ही सकारात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना नीट नेटके कपडे घालून येण्याबाबत माहिती देतो. विद्यार्थी पालकांच्या पहिल्याच सभेत याबाबी सांगितल्या जातात. महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांनी फाटलेल्या जीन्स,तोकडी कपडे घालण्यास मनाई करणयात आलीय'
शाळेतल्या गणवेश नियमातून विद्यार्थी बाहेर पडल्यावर महाविद्यालयीन विश्वात जाण्यासाठी उत्सुक असतात. कॅम्पसमध्ये हवी ती फॅशन स्टाईल अनुभवता येईल अशी तरुणांची अपेक्षा असते. पण महाविद्यालयातील या नियमांमुळे विद्यार्थ्यांचीही नीराशाच झाली. अनेकांना तर प्रवेशद्वारातून पुन्हा घरी पाठवण्याचाही अनुभव येतो.'रोज डे' ला हवे तसे कपडे घातले तर घरी पाठवतात, हे अपमानकारक असल्याचे विद्यार्थीनी सोनल गायकर सांगते.
या प्रकरणी विद्यापीठ अनुदान आयोग ज्या अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठ काम करतात तर स्थानिक विद्यीपीठ अशा वरिष्ठ आस्थापनांकडून कोणत्याही गाईडलाईऩ्स देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कोणते कापडे परिधान करावेत याबाबत ठोस अशा काहीही सूचना नाहीत. पण महाविद्यालयानी आता आपल्या पातळीवर हे नियम राबवलेत. महाविद्यालयांमध्ये शिस्त असावीच. त्यासाठी नियमही असायला हवेत. पण एखाद दिवशी केवळ अपेक्षित कपडे घालून विद्यार्थी आले नसतील तर महाविद्यालयात प्रवेश देण्यापासून रोखण्याबाबत पुन्हा विचार व्हावा अशीही मागणी आता केली जात आहे.