`काहीजण सुपाऱ्या घेऊन....` मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
Manoj Jarange on MNS Chief Raj Thackeray: मराठ्यांत फूट पाडण्याच तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही ते राज ठाकरेंना म्हणाले.
Manoj Jarange on MNS Chief Raj Thackeray: मराठा आरक्षणप्रश्नी महत्वाची भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. आरक्षण मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय. या दोघांमध्ये नेमकं काय घडलंय? जाणून घेऊया.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा समाजानं विजयोत्सव साजरा झाला मग पुन्हा उपोषण कशासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेंनी दोनदा उपोषण केलं. त्यानंतर अध्यादेश आला. त्यातून नेमकं काय मिळालं हे कुणालाच कळलेलं नाही. मात्र अध्यादेशानंतर विजयोत्सव साजरा होत असेल तर पुन्हा उपोषण कशासाठी? हे समजण्यापलिकडचं आहे असंही राज ठाकरेंनी म्हंटल आहे. यावर मनोज जरांगेंनी पलवटवार केलाय. सरकारची सुपारी घेतल्यासारखं राज ठाकरेंनी वक्तव्य करु नये असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. काही जण सरकारच्या सुपाऱ्या घेऊन बोलतायत, ते आम्हाला विचारतायत मुंबईला जाऊन काय झालं.? अशा शब्दात जरांगेंनी राज ठाकरेंवर टिका केली आहे.
मराठ्यांच्या पोरांनी यांच्या घोषणा दिल्यावर मग हे म्हणतात विजय झाला.काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे घटना तज्ञांना विचारून घ्या, असे जरांगे म्हणाले. तसेच मराठ्यांत फूट पाडण्याच तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही ते राज ठाकरेंना म्हणाले.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी उपोषण करतोय, असे जरांगेंनी म्हटलंय. गेल्या 75 वर्षात जो कायदा झाला नाही त्यांच्यासाठी हा विजय झाला असल्याचा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना हाणला आहे. राज ठाकरे हे सरकारच्या सुपाऱ्या घेऊन बोलत असल्याचे ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षण सर्व्हेक्षण करण्यासाठी गरज असेल तर मुदतवाढ द्यावी. गरज नसेल तर देऊ नये असंही जरांगे म्हणाले.
भाजपवर टीका
ईडीवरून राज ठाकरेंनीही भाजपवर टीका केलीय. देशात सुरू असलेलं राजकारण भविष्यात भाजपला परवडणारं नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. ईडी चौकशांवरून राज ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय. टोलवरूनही त्यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय. आपला टोलला विरोध नाही मात्र त्यात पारदर्शकता असायला हवी असं राज ठाकरेंनी सुनावलंय.