मुंबई :  सर्वसामान्यांचे जगणं सध्या महाग झालंय. पेट्रोल-डिझेल तसेच घरघुती वापराच्या LPG च्या दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एम्पलॉयी प्रोव्हिडंट फंड (Employee Provident Fund EPF)च्या  व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ६ कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. आतापर्यंत EPF सब्सक्राइबर्सपैकी ज्यांना गेल्यावर्षी व्याज मिळाले नव्हते. त्यांना या निर्णयामुळे दुहेरी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.


EPF वर मिळणाऱ्या व्याजदरात कपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकटकाळात कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात EPF मधून रक्कम काढली होती. याच दरम्यान पीएफचा भरणादेखील कमी झाला आहे. यामुळे Employees’ Provident Fund Organisation (EPFO)व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते.  आज सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) ची बैठक होणार आहे. त्यात EPF च्या व्याजदरात कपातीचा निर्णय होऊ शकतो.


आर्थिक वर्ष 2020 मध्ये EPFO च्या कमाईत घट झाली आहे. पीटीआय (PTI)शी बोलताना विश्वस्त ई रघुनाथ यांनी म्हटले की, '4 मार्च रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज ची बैठक श्रीनगरमध्ये होणार आहे. परंतु प्राप्त ईमेलमध्ये व्याज दरांतील कपातीबाबत उल्लेख केलेला नाही'.


 केंद्र सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज देण्याची घोषणा केली होती. CBT ने म्हटले होते की, 31 मार्च पर्यंत दोन टप्प्यात व्याजाचे वाटप करण्यात येईल. यात 8.15 टक्के गुंतवणूकीतून आणि 0.35 टक्के व्याज इक्विटमधून व्याजाचे वितरण करण्यात येणार आहे.


EPF वर 7 वर्षांतील सर्वात कमी व्याज


आर्थिक वर्ष 2020 मध्ये EPF वर 8.5 टक्के व्याज मिळाले होते. हा व्याजदर गेल्या 7 वर्षातील सर्वांत कमी व्याज दर होता. गेल्या वर्षी 2019 मध्ये EPF वर 8.65 टक्के व्याज मिळाले होते. 2018 या वर्षी 8.55 टक्के व्याज मिळाले होते.  2016 या वर्षी 8.8 टक्के व्याज मिळाले होते. 


देशभरात EPFचे साधारण 6 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये अनेक लोकांच्या KYC मध्ये घोळ झाल्याने व्याज मिळण्यास उशीर झाला होता. त्यानंतर आता पुन्हा व्याज दरात कपात झाल्यास, कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.