पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे हैराण झालेल्यांसाठी ई-बाईकचा पर्याय
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे लोकं इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय शोधत आहे.
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढलेल्या किंमतींमुळे बजेट कोलमडले आहे. इंधनाच्या (petrol diesel price) रोजच्या दरवाढीचा फटका थेट खिशाला बसत असल्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे लोकं इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्याय शोधत आहे.
पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचा कल ई-सायकलकडे ( electric cycles ) किंवा ई-बाईककडे ( e bike )दिसून येत आहे. सायकल निर्मितीचे हब मानले जाणाऱ्या लुधियाना शहरातील कारखान्यांमध्ये ई सायकल बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
हिरो सायकलचे अभिषेक मुंजाल सांगतात की, 'भारतात कमी अंतराच्या प्रवासासाठी ई-सायकलचा ट्रेंड हळू हळू वाढत आहे. त्याच कारण ते पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आहेत'. पुढे ते म्हणाले की, 'गेल्या वर्षी 30 हजार बाईक विकल्या होत्या. तर या वर्षी ई-बाईकच्या मागणीत 100 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे'.
एवन सायकलचे ओमकार सिंह पहावा यांनी सांगितले की, 'पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे मागील दोन महिन्यात ई सायकलच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पेट्रोल - डिझेलच्या किंमती
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी सध्या सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते, दिल्लीत पेट्रोलची किंमत 91.17 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत 88.60 रुपये प्रति लीटर इतके रुपये आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत 91.57 प्रति लीटर तर डिझेलची किंमत 88.60 रुपये प्रति लीटर इतकी आहे.