Crime News In Marathi: दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने क्षुल्लक कारणासाठी बायकोचा जीव घेतला आहे. हत्येनंतर बायकोचा मृतदेह जंगलात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नव्हे तर, या पतीने ७० हजार देऊन बायकोला विकत घेतलं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या भयानक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पोलिस कंट्रोल रुमला एक फोन आला होता. त्यानुसार फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं होतं की फतेहपूरच्या बेरी परिसरातील जंगलात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. 


जंगलात मृतदेह सापडल्याची सूचना मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात सुरुवात केली. तपासात पोलिसांनी जंगलाच्या दिशेने गेलेल्या गाड्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चौकशीत शनिवारी रात्री 1.40 वाजण्याच्या सुमारास एक ऑटो रिक्षा तेथे आढळून आली होती. पोलिसांनी ही या रिक्षाचा मार्ग ट्रॅक केल्यानंतर त्यांना रिक्षाचा रजिस्ट्रेशन नंबरदेखील मिळाला. ही रिक्षा दिल्लीतील छतरपूरच्या गदईपुर बांधा परिसरात राहणारा अरुणची असल्याचे तपासात समोर आले. 


पोलिसांनी अरुणची चौकशी करण्यात सुरुवात केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अरुणने पोलिसांना सांगितलं होतं की, रिक्षात ज्या महिलेचा मृतदेह होता तिचे नाव स्वीटी असून धरमवीर नावाच्या व्यक्तीची ती पत्नी होती. धरमवीर हा अरुणचा मेव्हणा असून दोघांनी मिळून तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. 


तिघांनी दिल्ली-हरयाणा बॉर्डरजवळील नांगलोई परिसरात स्वीटीचा गळा दाबत तिची हत्या केली त्यानंतर जंगलात तिचा मृतदेह फेकून दिला. धरमवीरला त्याच्या पत्नीचा स्वभाव आवडत नव्हता त्यामुळं नाखुश असायचा. ती अनेकदा कोणालाही न सांगता माहेरी जायची, त्यामुळं तो रागात असायचा, असं अरुणने पोलिसांना सांगितले. 


दरम्यान, धरमवीरने स्वीटीला 70 हजारांत विकत घेतले होते. त्यामुळं कोणालाच तिच्या माहेरच्यांविषयी माहिती नव्हती. स्वीटीदेखील कधीच तिच्या माहेरच्या लोकांविषयी जास्त बोलत नसे. तिचे कुटुंबीय बिहारच्या पटनायेथे राहायचे इतकंच तिने सांगितले होते, असंही अरुणने पोलिसांनी सांगितले आहे.


पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी स्वीटीला रेल्वे स्थानकात सोडतो असं सांगून घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी तिची हत्या केली, असं चौकशीत समोर आले आहे.