West Bengal Crime News: प्रियकर प्रेयसीबरोबर पळून गेल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. अगदी घरचे मनाविरुद्ध लग्न करत असल्याने लग्नाआधीही अशाप्रकारे प्रियकर प्रेयसी पळून गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र पश्चिम बंगालमधील मालदामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक तरुण लग्नासाठी मुलगी पहायला गेला होता. त्यावेळी त्याचा चांगला दणक्यात पाहुणचार मुलीकडच्यांनी केला. मात्र मुलाला मुलगी आवडली नाही. पण या भेटीत हा तरुण मुलीच्या आईच्या प्रेमात पडला. केवळ तो प्रेमातच पडला असं नाही तर नंतर हे दोघे घर सोडून पळूनही गेले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून या पळून गेलेल्या माहिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेत पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 


25 मार्चला घडला प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तक्रारदार पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार 25 मार्च रोजी गजोल पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या इचाहार गावात घडला. या पीडित पतीने जिल्ह्याच्या गजोल गावी जाऊन अनेक ठिकाणी पत्नीचा शोध घेतला. मात्र त्याला पत्नीची कोणतीही माहिती मिळाली नाही. नेमकं घडलं काय आणि कसं याबद्दल बोलताना या व्यक्तीने आमची मुलगी लग्नाच्या वयाची असून तिच्यासाठी नवरा मुलगा शोधण्याचे प्रयत्न कुटुंबीय करत आहेत. 25 मार्च रोजी असाच एक मुलगा मुलीला पाहण्यासाठी आला होता.


दारोदारी फिरतोय पती...


या मुलाचा योग्यपद्धतीने पाहुणचार या मुलीच्या कुटुंबियांनी केला. मात्र या मुलाने मुलगी पसंत नसल्याचं तिथेच सांगितलं. यानंतर मुलगा त्याच्या नातेवाईकांबरोबर निघून गेला. पण अचानक या मुलीची आई घरातून गायब झाली. त्यामुळे ही महिला या तरुणाबरोबरच पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. तो मुलगा नंतर माझ्या पत्नीबरोबर पळून गेला, असं या पतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. अनेक प्रयत्न करुनही पत्नीची काहीही माहिती न मिळाल्याने या व्यक्तीने अखेर पोलिसांकडे तक्रार केली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार पळून गेलेल्या माहिलेला 3 मुलं आहेत. असं असतानाही ती मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरुणाबरोबर पळून गेली. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. या महिलेचा पती तर तिचा फोटो घेऊन जमेल तिथे तिला शोधत फिरतोय.


या व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनीही या महिलेचा शोध सुरु केला असून लवकरच या दोघांचा ठावठिकाणा सापडेल असं पोलिसांचं म्हणणं आहे.