नवी दिल्ली - हायब्रीड कारच्या मार्केटमध्ये आतापर्यंत मारुती सुझुकी कंपनीने प्रवेश केला नव्हता. पण येत्या २०२० मध्ये कंपनीने टोयोटाच्या सोबतीने नवी हायब्रीड कार मार्केटमध्ये आणण्याचे नियोजन केले आहे. मारुतीची ही पहिलीच पूर्णपणे हायब्रीड कार असेल. अर्थात कंपनीकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. टोयोटा कोरोला सेदानचे इंजिनिअरिंग मारुतीसोबत संयुक्तपणे निर्मिण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात हायब्रीड तंत्रज्ञानाच्या विकासावर सुझुकी आणि टोयोटा एकत्रितपणे काम करत आहेत. हायब्रीड पॉवर टरेन इंजिनमुळे कारचे मायलेज ३० टक्क्यांनी वाढू शकते, असे मारुती सुझुकीने म्हणणे असल्याचे एका माध्यमाने म्हटले आहे. डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मिती थांबवण्यावर सुझुकी गांभीर्याने विचार करत आहे. त्यातच २०२० मध्ये उत्सर्जनाची BS6 नियमावली लागू होत आहे. त्यानंतर डिझेलवरील गाड्यांची निर्मिती कंपनीकडून थांबविण्यात येऊ शकते. कारण या नियमावलीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या डिझेल कारच्या किंमती अडीच लाखांपर्यंत वाढू शकतात. सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमतीमध्ये एक लाख रुपयांचा फरक आहे. BS6 नियमावली लागू झाल्यावर हाच फरक अडीच लाखांपर्यंत जाईल.


हायब्रीड कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि पारंपरिक इंजिन बसवलेले असते. ज्यामुळे कारची ताकद वाढते. हायब्रीड कारमध्येही तीन प्रकार असतात. माईल्ड हायब्रिड, फुल हायब्रिड आणि प्लग इन हायब्रिड. फुल हायब्रिड इंजिन विशेष असते. यामध्ये पारंपरिक इंजिनापेक्षा बॅटरीचा वापर जास्त केला जातो.  कारचा वेग कमी झाल्यावर इलेक्ट्रिक मोटार काम करू लागते. त्यामुळेच कारचे मायलेज वाढते. 


पूर्णपणे हायब्रीड कारचे मायलेज पारंपरिक इंजिनावर चालणाऱ्या कारपेक्षा जास्त असते. टोयोटा प्रियस पहिल्यापासूनच पूर्णपणे हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित आहे. या गाड्यांचे वजनही हलके असते. हायब्रीड कारमध्ये बॅटरी चार्ज करण्याचीही गरज नसते. यामधील तंत्रज्ञानाच्या साह्याने गाडी चालत असतानाच बॅटरी चार्ज होत असते.