मुंबई - देशातील मध्यमवर्गीयांचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या मारुती सुझुकीच्या काही गाड्यांच्या विक्रीमध्ये गेल्या महिन्यात घट झाल्याचे पाहायला मिळाले. देशातील सर्वांत मोठ्या कार निर्मिती कंपनीच्या कार विक्रीमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये १.३ टक्क्यांनी घट झाली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये मारुती सुझुकीच्या देशात १,३०,०६६ गाड्या विकल्या गेल्या होत्या. पण डिसेंबर २०१८ मध्ये हा आकडा १,२८,३३८ पर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी घरगुती वापराच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये १.८ टक्क्यांची वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या प्रकारातील १,१९,२८६ गाड्या विकल्या गेल्या होत्या. तर डिसेंबर २०१८ मध्ये १,२१,४७९ गाड्या विकल्या गेल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सुझुकीच्या आल्टो, वॅगन आर या छोट्या गाड्यांना मध्यमवर्गीय ग्राहकांकडून मोठी मागणी असते. पण त्याच्या विक्रीत २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये घट झाल्याचे दिसते. डिसेंबर २०१७ मध्ये या श्रेणीतील ३२,१४६ गाड्यांची विक्री झाली होती. तर डिसेंबर २०१८ मध्ये या श्रेणीतील २७,६६१ गाड्यांची विक्री झाली. एकूण १४ टक्क्यांनी या गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. यासोबतच स्विफ्ट, बलेनो, सेलेरिओ, इग्निस आणि डिझायर या गाड्यांच्या विक्रीतही ३.८ टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळते. डिसेंबर २०१७ मध्ये या गाड्यांच्या विक्रीचा आकडा होता ५३,३३६. डिसेंबर २०१८ मध्ये तो कमी होऊन ५१,३३४ पर्यंत खाली आला आहे. 


हे सर्व घडत असताना दुसरीकडे मध्यम श्रेणीतील सेदान सियाजच्या विक्रीमध्ये २३८२ वरून ४७३४ पर्यंत वाढ झाली आहे. विटारा ब्रेजा, एस क्रॉस आणि एर्टिगा या गाड्यांच्या विक्रीतही ४.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मारुतीच्या निर्यातीमध्येही २०१७ च्या तुलनेत ३६.४ टक्क्यांची घट झाली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये मारुतीने १०,७८० वाहने निर्यात केली होती. तर डिसेंबर २०१८ मध्ये ६,८५९ वाहने निर्यात केली आहेत.